देश
निवडणुकीच्या फंडासाठी राज्यात प्लॅस्टिकबंदी : राज ठाकरे
प्लॅस्टिक तयार करणाऱ्या कंपन्यांकडून आगामी निवडणुकीत फंड मिळावा म्हणून प्लॅस्टिकबंदी केली गेली नाही ना, अशी शंका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केली. काही काळानंतर प्लॅस्टिकबंदीचा निर्णय केराच्या टोपलीत जाऊन सर्व काही पूर्ववत होईल, असा दावाही राज यांनी केला.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत राज ठाकरे बोलत होते. जोपर्यंत महापालिका आणि राज्य सरकार स्वतःची कामं नीट करत नाहीत, तोपर्यंत कुणीही दंड देऊ नये, असं आवाहनही राज ठाकरेंनी केलं. प्लॅस्टिकबंदीसारख्या मोठ्या निर्णयावर मुख्यमंत्री गप्प कसे, हा निर्णय सरकारचा आहे की फक्त विशिष्ट खात्याचा असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे अध्यक्ष रविंद्र मराठे यांच्यावरील कारवाईमागे मुख्यमंत्र्यांचाच हात असल्याचा घणाघातही राज ठाकरे यांनी केला.
प्लॅस्टिकबंदीचा निर्णय सरकारने घेतला आहे, मग आमच्या प्रश्नांना सरकारने उत्तर द्यावं, रामदास कदम यांनी नात्यांवर भाष्य करु नये, अशा शब्दात राज ठाकरे यांनी सुनावलं.
काकांना पुतण्याची भीती कधीपासून वाटायला लागली? असा सवाल पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी राज ठाकरेंना उद्देशून विचारला होता. आदित्य ठाकरेंच्या पुढाकाराने घेतलेल्या प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाला राज ठाकरेंनी केलेल्या विरोधाची किनार या वक्तव्याला होती.
राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रविंद्र मराठेंवरील कारवाईमागे मुख्यमंत्र्यांचाच हात
मराठेंच्या अटक प्रकरणी मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत, पीक कर्जातील घोळ झाकण्यात मराठेंनी सरकारला सहकार्य न केल्यानेच त्यांना तडकाफडकी अटक
निर्णय सरकारने घेतला, उत्तर सरकारने द्यावं, रामदास कदमांनी नात्यावर भाष्य करु नये
प्लास्टिकबंदीचा निर्णय कोणतीही पूर्वतयारी न करता घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयासारखा
स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली निव्वळ कर आकारणी
आधी सरकारने आपलं काम नीट करावं, मग लोकांकडून दंड वसूल करावा
प्लास्टिकबंदी करताना पर्यायी व्यवस्था दिली का नाही? प्लास्टिक वाईट नाही, व्यवस्थापन नीट नाही
इतर अनधिकृत गोष्टींवर कारवाई करण्यासाठी का धजावत नाही?
नागरिकांना कचरा टाकण्यासाठी कचरा कुंड्यांचीही व्यवस्था नाही
प्लास्टिक व्यापाऱ्यांकडून निवडणुकीच्या फंडासाठी पैसे उकळण्याचा प्रयत्न
नाशकात मनसेने कचऱ्यापासून खत प्रकल्पाची निर्मिती केली, महापालिकांनी शहरात स्वच्छता राखण्यासाठी काय काय केलं?
बंदी असेल तर सरसकट सर्वच प्लास्टिकवर घालावी, ब्रँडेड चिप्स पाकिटांच्या प्लास्टिकला मुभा का?
प्लास्टिकबंदीची काय घाई होती? प्लास्टिकबंदीबाबत मुख्यमंत्र्यांचं मौन, हा निर्णय सरकारचा आहे की विशिष्ट खात्याचा?