देश
भंडाऱ्यातील प्रिती बारिया हत्या प्रकरणात दोन्ही आरोपींना फाशी
भंडाऱ्यातील प्रिती बारिया हत्या प्रकरण चांगलेच गाजले होते. या प्रकरणातल्या दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भंडारा जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजय देशमुख यांनी हा निर्णय दिला. ए.सी. दुरुस्त करण्याच्या बहाण्याने घरात घुसून तिघांवर केलेल्या हल्ल्यात प्रिती बारिया यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या दोन मुलांना कायमचे अपंगत्त्व आले. ३० जुलै २०१५ ला ही घटना घडली होती. या प्रकरणातले दोषी आरोपी आमीर शेख आणि सचिन राऊत यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
चोरट्यांनी रुपेश बारिया यांच्या पत्नी प्रिती बारिया यांच्या डोक्यावर हातोडीने वार केले होते. ज्या घटनेत त्यांना जागीच मृत्यू झाला. बारिया यांच्यावर वार केल्यानंतर चोरट्यांनी सोन्याचे आणि चांदीचे दागिने आणि ३ लाख २० हजारांची रोकड लंपास केली. बारिया यांच्या घरी चोरी करण्यापूर्वी आमीर शेख आणि सचिन राऊत या दोघांनीही म्हाडा कॉलनी येथील रविंद्र शिंदे यांच्या घरीही चोरी केली. त्यांच्या घरात शिरतानाही या दोघांनीही एसी दुरुस्तीचेच कारण सांगितले होते. यावेळी या दोघांनी शिंदे यांच्या घरी एकटीच असलेली त्यांची मुलगी अश्विनी हिच्या डोक्यात हातोडीने वार केले होते. त्यानंतर शिंदे यांच्या घरातले दागिने, लॅपटॉप आणि एटीएम कार्डही चोरले होते.
रविंद्र शिंदे यांच्या घरातून चोरलेले एटीएम कार्ड वापरून या दरोडेखोरांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे पोलिसांना या चोरट्यांचे लोकेशन समजले. या लोकेशनवरूनच त्यांनी चोरट्यांचा छडा लावला आणि त्यांना अटक केली. आमीर शेख आणि सचिन राऊत या दोघांनाही जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.