Menu

देश
विज्ञान केंद्राचा मार्ग मोकळा

nobanner

नेरुळ येथील प्रस्तावित विज्ञान केंद्रासाठी सिडको वाढीव एफएसआय देण्यास तयार असल्याचे समजते. शुक्रवारी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र व पालिकेचे आयुक्त रामास्वामी एन यांची संयुक्त बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. यामुळे पालिका पिंपरी-चिंचवड पालिकेच्या धर्तीवर नेरुळ सेक्टर १९-अ मध्ये सायन्स पार्क बांधणार असून त्याजवळच एक वस्तुसंग्रहालय उभारले जाणार आहे.

शैक्षणिक केंद्र म्हणून उदयाला आलेल्या नवी मुंबईतील विद्यार्थ्यांत विज्ञानाची ओढ निर्माण व्हावी यासाठी नवी मुंबई पालिकेने नेरुळ येथील वंडर्स पार्क परिसरात विज्ञान केंद्राची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी वंडर्स पार्कमधील चिल्ड्रन पार्कसाठीची ७६१५ चौरस मीटर जमीन अपुरी पडत आहे. त्यामुळे पालिकेने जवळची ५९९७ व १३०० चौरस मीटरची जमिनी देण्याची मागणी केली आहे. या परिसरात सध्या येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहनतळाचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे. त्यासाठीही एक १३०० चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड मागण्यात आला आहे.

सिडकोकडे प्रलंबित असलेल्या मागण्यांसंदर्भात पालिकेचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. व नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची शुक्रवारी एका संयुक्त बैठक झाली. याला सिडको व पालिकेचे सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. यात शिरवणे येथील कत्तलखाना भूखंड, सावळी गाव पुनर्वसन, महापौर निवासस्थानासमोरचा भूखंड विकत घेणे, वृद्धाश्रम आणि विविध भूखंड हस्तांतर व नवीन ५२० भूखंडांची मागणी या मुद्दय़ांवर चर्चा करण्यात आली. विज्ञान केंद्रासाठी लागणारा अतिरिक्त व भूखंड व वाढीव दीड एफएसआयची मागणी तत्त्वत: मान्य करण्यात आली आहे.

वंडर्स पार्कचा भूखंड १० हेक्टर आहे. त्यावर सिडकोने ०.५ चटईक्षेत्र दिले तरी पालिकेला ते पुरेसे आहे. नवी मुंबई पालिका या शहरातील नियोजन प्राधिकरण आहे. या भूखंडासाठी ०.५ वाढीव चटईक्षेत्र देणे आहे. पालिकेने जादा चटईक्षेत्राची मागणी केली आहे. पालिकेला येथील कमी जमिनीत एक भव्य वस्तुसंग्रहालय उभारण्यास पुरेशी जागा उपलब्ध होणार आहे.

पालिका वृद्धाश्रम उभारणार

नवी मुंबईत एकही शासकीय अथवा निमशासकीय वृद्धाश्रम नाही. सिडकोने दिलेल्या भूखंडावर काही खासगी संस्थांनी वृद्धाश्रम उभारले आहेत, पण ते सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. त्यामुळे नवी मुंबई पालिका स्वतंत्र वृद्धाश्रम बांधणार आहे. सिडकोने काही भूखंड सामाजिक उपयोगासाठी राखून ठेवले आहेत. त्यामुळे नेरुळ, ऐरोली आणि घणसोली या नोडमध्ये उपलब्ध असलेल्या सामाजिक भूखंडावर पालिका वृद्धाश्रम उभारण्यास तयार आहे. हे भूखंड सिडकोने द्यावेत, अशी मागणी शुक्रवाराच्या बैठकीत करण्यात आली. ती सिडकोने मान्य केली आहे. नवी मुंबईत एक सर्वसामान्यांसाठी एक अद्ययावत वृद्धाश्रम बांधण्यात यावा अशी मागणी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी काही दिवसांपूर्वी पालिकेकडे केली होती.

नवी मुंबई हे एक नियोजनबध्द शहर आहे. सिडको व पालिकेच्या माध्यमातून अनेक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. काही सुविधा निर्माण केल्या जात आहेत. शहराची ओळख ठरेल असे विज्ञान केंद्र उभारण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी वंडर्स पार्कमधील भूखंडाला वाढीव एफएसआय मिळावा, अशी मागणी होती. ती शुक्रवारच्या बैठकीत मंजूर करण्यात आली.