दुनिया
व्यापारात अमेरिकेची दादागिरी, भारत देणार जशास तसे उत्तर
अमेरिकेने चीन आणि भारता बरोबर व्यापार युद्ध सुरु केले असून भारतानेही अमेरिकेला जशास तसे उत्तर दिले आहे. अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर कर लादल्यानंतर भारतानेही अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवर सीमा शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने अमेरिकेतून आयात होणाऱ्या ३० वस्तूंवरील सीमाशुल्क वाढवले असून त्यासंबंधीची सुधारीत यादी जागतिक व्यापार संघटनेला पाठवली आहे.
अमेरिकेतून आयात होणऱ्या महागडया मोटार सायकल, काही लोखंडी-स्टीलच्या वस्तू, बोरिक अॅसिड आणि डाळींवर ५० टक्क्यापर्यंत सीमा शुल्क वाढवण्यात येणार आहे. भारतातून आयात होणाऱ्या स्टील आणि अॅल्युमिनियमवर कर लादून अमेरिकेला त्यातून २४१ मिलियन डॉलरचा फायदा होणार आहे.
अमेरिकेच्या करवाढीमुळे जितका भारतीय व्यापारावर परिणाम होणार आहे. भारतानेही तितकीच करवाढ केली आहे. ३० अमेरिकन उत्पादनांना देण्यात येणारी सवलत बंद करत आहोत असे भारताने जागतिक व्यापार संघटनेला कळवले आहे. मे महिन्यात भारताने बदाम, सफरचंद आणि मोटारसायकलसह २० उत्पादनांवर १०० टक्के करवाढ करण्याचा प्रस्ताव दिला होता.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात चिनी वस्तूंवर ५० अब्ज डॉलर्सचा कर लादला आहे. त्यामुळे बडया अर्थव्यवस्था असलेल्या या दोन देशांतील व्यापार युद्ध शिगेला जाणार आहे. ट्रम्प यांनी व्यापारमंत्री विल्बर रॉस व अर्थमंत्री स्टीव्हन नुशिन तसेच व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट लायटीझर यांच्याशी नव्वद मिनिटे चर्चा केल्यानंतर आयात शुल्कात जबर वाढ करण्याचा निर्णय घेतला. चीनने लगेचच याचा सूड घेत अमेरिकी वस्तूंवर कर लादण्याचे सूचित केले आहे.
व्यापार मतभेद मिटवण्यास अमेरिका तयार
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारविषयक समस्या सोडवण्यासाठी जूनच्या अखेरीस दोन्ही देशांत अधिकाऱ्यांच्या स्तरावर बैठक होणार आहे. पोलाद आणि अॅल्युमिनियमवरील आयात कर, वैद्यकीय उपकरणांच्या किमती, निर्यातीसंदर्भातील सवलती अशा अनेक मुद्दय़ांवर दोन्ही देशांत धोरणात्मक मतभेद असले तरी, ते सोडवण्यासाठी अमेरिका सकारात्मक असल्याची माहिती केंद्रीय उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली.