Menu

देश
‘सरदार पटेल काश्मीर पाकिस्तानला देण्यास तयार होते’

nobanner

सरदार वल्लभभाई पटेल हैदराबादच्या बदल्यात काश्मीर पाकिस्तानला देण्यास तयार होते, असा दावा काँग्रेस नेते सैफुद्दीन सोझ यांनी केला आहे. हैदराबादचा भूभाग पाकिस्तानशी जोडलेला नाही, त्यामुळे तुम्हाला हैदराबाद कशाला हवे, असा प्रश्न सरदार पटेल यांनी पाकिस्तानला विचारला होता, असे सोझ यांनी म्हटले आहे.

सैफुद्दीन सोझ यांच्या काश्मीरसंदर्भातील पुस्तकाचे सोमवारी दिल्लीत प्रकाशन झाले. या पुस्तकाचे पी. चिदंबरम यांच्या हस्ते प्रकाशन होणार होते. मात्र, सोझ यांच्या वादग्रस्त विधानांमुळे काँग्रेस पक्षनेतृत्वाने नेत्यांनी या पुस्तक प्रकाशन सोहळ्यापासून लांब राहावे असे आदेश दिले होते. त्यामुळे पी. चिदंबरम, मनमोहन सिंग अशा दिग्गज नेत्यांनी या पुस्तक प्रकाशन सोहळ्याकडे पाठ फिरवली. मात्र, माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश या सोहळ्याला उपस्थित होते.

पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सोझ म्हणाले, काँग्रेसचा या पुस्तकाशी संबंध नाही. हे पुस्तक माझे असून याची मी जबाबदारी स्वीकारतो. मला पक्षाला अडचणीत आणायचे नाही, असे त्यांनी सांगितले. नेहरु आणि सरदार पटेल हे भारताचे सुपूत्र असल्याचे सांगत सोझ पुढे म्हणाले, सरदार पटेल हे व्यावहारिक होते. त्यांनी चांगल्या हेतूने पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान लियाकत अली खान यांना काश्मीर देण्याची तयारी दर्शवली होती. तुम्ही हैदराबादची मागणी सोडून द्या. हैदराबाद सागरी किंवा अन्य कोणत्याही मार्गाने पाकिस्तानशी जोडलेला नाही. मग तुम्ही हैदराबादवर कसा काय दावा करु शकता असे पटेल यांनी म्हटल्याचे सोझ यांनी सांगितले.