देश
अंगारकीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी विशेष व्यवस्था; जाणून घ्या दर्शनाची वेळ
मंगळवारच्या संकष्टी चतुर्थीला “अंगारकी” म्हटले जाते. या दिवशी गणेश भक्त गणपतीचे दर्शन घेतात आणि उपवासही करतात. चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष स्थान असून या दिवशी भक्तांकडून गणपतीची मनोभावे पूजा केली जाते. शहरातील गणपतीच्या मंदिरांमध्येही या दिवशी पूजेचे विशेष आयोजन केले जाते. ३१ जुलैच्या मंगळवारी संकष्टी चतुर्थी असून दादरच्या सिद्धिविनायक मंदिरातही त्यानिमित्त विशेष सुविधा करण्यात आली आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून चोख व्यवस्था करण्यात आल्याचे सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली.
दर्शनाची वेळ
– सोमवारी मध्यरात्री १.३० ते पहाटे ३.१५ वाजेपर्यंत
– मंगळवारी पहाटे ३.५० ते रात्री ८ वाजेपर्यंत
– रात्री ९.५० ते रात्री १२ वाजेपर्यंत
अशी असेल सुविधा
– पुरुष, महिला आणि अपंग व गर्भवतींसाठी वेगळ्या रांगा असतील.
– दत्ता राऊळ मार्गाकडून महिलांची रांग असेल तर रविंद्र नाट्य मंदिराच्या बाजूने पुरुषांची रांग असेल.
– मंदिरातील अधिकारी व कर्मचारी यांना ओळखपत्र दाखवून रिद्धी प्रवेशद्वारातून प्रवेश देण्यात येईल.
– पहाटे १२.१० ते १.३० काकड आरती व महापूजा असेल.
– पहाटे ३.१५ ते ३.५० आरती
– रात्री ८.१५ ते ९.५० महापूजा, नैवेद्य व आरती
– मंदिर परिसरात भाविकांसाठी वैद्यकीय पथक तैनात करण्यात येणार असून अॅम्ब्युलन्सचीही सुविधा करण्यात येणार आहे.
– पिण्याचे पाणी, चहा, मोबाईल टॉयलेट यांसारख्या व्यवस्थाही मंडपात करण्यात येणार आहेत.
– प्रभादेवी स्थानकापासून भाविकांना सिद्धिविनायक मंदिरापर्यंत येण्यासाठी मोफत बसेसची सुविधा करण्यात आली आहे. या बसेस सोमवारी रात्री १२ पासून मंगळवारी रात्री १२ पर्यंत सुरु असतील.
ही काळजी घ्या
– मंदिरात दर्शनासाठी येताना इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच मौल्यवान वस्तू आणू नका.
– रांगेतून सर्वांना दर्शन मिळणार असल्याने कोणीही धक्काबुक्की करु नये.
– जे नागरिक दुचाकी आणि चारचाकी वाहनाने येतील त्यांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंदिरापासून दूर अंतरावर आपली वाहने लावण्याची व्यवस्था करावी असे आवाहन आदेश बांदेकर यांनी केले आहे.