खेल
आशियाई खेळांमध्ये इराण भारताला कडवी टक्कर देऊ शकतो – रिशांक देवाडीगा
ऑगस्ट महिन्यात इंडोनेशियाच्या जकार्तामध्ये होणाऱ्या आशियाई खेळांसाठी भारताच्या कबड्डी संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राच्या रिशांक देवाडीगा आणि गिरीश एर्नाक या खेळाडूंची संघात निवड झालेली आहे. कबड्डीत सध्या भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं वर्चस्व राखून आहे, मात्र इराण आशियाई खेळांमध्ये भारताला कडवी टक्कर देऊ शकतो असं मत रिशांक देवाडीगाने व्यक्त केलं आहे.
“आशियाई खेळांसाठी सर्व संघ हे जय्यत तयारी करुन आलेले असतात. दुबईत झालेल्या कबड्डी मास्टर्स स्पर्धेत आम्हाला अन्य संघ कसे खेळू शकतात याचा अंदाज आलेला आहे. इराणने दुबईत आपल्या ज्युनिअर संघाला उतरवलं होतं, त्यामुळे सिनीअर खेळाडू आशियाई स्पर्धांसाठी उतरतील हे स्पष्ट आहे. त्यामुळे आशियाई खेळांमध्ये आम्हाला इराणकडून सावध रहावं लागणार आहे. कोरिया, बांगलादेश सारखे संघ भारताला टक्कर देऊ शकणार नाहीत.” पीटीआयशी बोलताना रिशांकने आपलं मत व्यक्त केलं.
प्रो-कबड्डीचे पहिले हंगाम यू मुम्बाकडून खेळल्यानंतर रिशांकची उत्तर प्रदेश योद्धाज संघासाठी निवड झाली. यानंतर रिशांकच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या संघाने राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. या कामगिरीनंतर रिशांक आणि गिरीश एर्नाकची भारतीय संघात निवड झाली होती. त्यामुळे आशियाई खेळांमध्ये रिशांकच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.