खेल
इंग्लंडच्या हवामानात संयम राखणं गरजेचं – अजिंक्य रहाणे
१ ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. बर्मिंगहॅमच्या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे, घरच्या मैदानावर कसोटी सामन्यांमध्ये सर्वोत्तम खेळ करणारा भारतीय संघ इंग्लंडमध्ये ढेपाळतो हा इतिहास आहे. मात्र यंदाचा दौरा हा भारतीय संघासाठी अनेक बाबींमध्ये वेगळा ठरणार आहे. सध्या जागतिक क्रमवारीत भारताचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे, भारताने अनेक खेळाडू हे तरुण असल्यामुळे त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जात आहे. मात्र इंग्लंडमधील वातावरणाशी जुळवून घ्यायचं असल्यासं, खेळपट्टीवर संयम राखणं ही अत्यंत गरजेचं असल्याचं भारताचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेने म्हटलं आहे.
“इंग्लंडमधली खेळपट्ट्यांवर गोलंदाजांना नेहमी मदत मिळते, मात्र असं असलं तरीही गोलंदाजांसाठी सर्व गोष्टी सोप्या असतील अशातली गोष्ट नाही. प्रत्येक षटकांमध्ये विकेट मिळवण्याऐवजी संयमाने मारा केल्यास गोलंदाजांना यश मिळू शकेल. गोलंदाजीत एकाने जरी टिच्चून मारा करत धावसंख्येला खिळ घातला तर इतर गोलंदाज विकेट घेण्याचं काम करु शकतात.” सामन्याआधी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अजिंक्य रहाणे बोलत होता.
दक्षिण आफ्रिकेत भारतीय गोलंदाज २० बळी घेऊ शकतील असं कोणालाही वाटत नव्हतं. मात्र भारताच्या गोलंदाजांनी ही कामगिरी करुन दाखवली. इंग्लंडमध्येही भारताचे गोलंदाज अशी कामगिरी करु शकतात. याचसोबत गोलंदाजांवर अधिक दबाव येणार नाही, याचीही आम्हाला काळजी घ्यावी लागेल. मोहम्मद शमी, उमेश यादव हे गोलंदाज २०१४ साली इंग्लंडमध्ये खेळलेले आहेत. त्यामुळे या दोघांच्या गोलंदाजांचा आम्हाला फायदा होईल. याचसोबत इशांत शर्मानेही काऊंटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे भारतीय गोलंदाजांमध्ये इंग्लंडच्या संघाला दोनवेळा सर्वबाद करण्याची ताकद असल्याचंही अजिंक्य म्हणाला.