देश
इंजिनमधील बिघाडाने मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत
पावसाने विश्रांती घेतल्याने बुधवारी मध्य रेल्वेवरील वाहतूक सुरळीत सुरु असतानाच दुपारी कल्याण स्थानकाजवळ गोदावरी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे मुंबईकडे येणाऱ्या जलद मार्गावरील लोकल गाड्या उशिराने धावत आहेत.
मंगळवारी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले होते. मात्र, बुधवारी सकाळपासूनच पावसाने विश्रांती घेतली. मध्य रेल्वेवरील वाहतूक सुरळीत सुरु असल्याने प्रवाशांनाही दिलासा मिळाला. मात्र, बुधवारी तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला.
गोदावरी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये कल्याण स्थानकाजवळ बिघाड झाला. यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जलद मार्गावरील वाहतूक खोळंबली. याचा फटका लोकल ट्रेनच्या प्रवाशांनाही बसला. कसारा व कर्जत येथून येणाऱ्या लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. जवळपास अर्धा तासानंतर इंजिनमधील बिघाड दुरुस्त करण्यात आला आणि या मार्गावरील सेवा पुन्हा सुरु झाली. मात्र, यामुळे पुन्हा एकदा मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले.