Menu

देश
एक प्रवास शेतकऱ्याच्या स्वप्नाचा…८० वर्षांनी पूर्ण झालं मर्सिडिज विकत घेण्याचं स्वप्न

nobanner

अनेकदा लहानपणी पाहिलेलं स्वप्न वेळेसोबत आपण विसरत जातो. त्यांची जागा घेतात ती नवी स्वप्नं आणि मग सुरु होता ती पूर्ण करण्यासाठीची धावपळ. पण एखादं स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुम्ही किती वेळ वाट पाहू शकता ? याचं उत्तर देणं तसं कठीणच…पण तामिळनाडूमधील एका शेतकऱ्याला आपलं स्वप्न पूर्ण होण्यासाठी वयाची तब्बल ८० वर्ष वाट पहावी लागली. ८८ वर्षीय देवराजन आज एका मर्सिडिज बेंझ बी-क्लास कारचे मालक आहेत.

८८ वर्षीय देवराजन यांचा हा प्रवास अगदी भावनिक आहे. मर्सिडिज बेंझ ट्रान्स कारने त्यांचा व्हिडीओ शूट करत हा प्रवास दाखवण्याच प्रयत्न केलाय. देवराजन जेव्हा फक्त आठ वर्षांचे होते तेव्हा त्यांनी सर्वात आधी मर्सिडिज कार पाहिली होती. महत्वाचं म्हणजे जेव्हा त्यांनी कार पाहिली होती तेव्हा ही मर्सिडीज आहे याची त्यांना कल्पनाही नव्हती. पण मर्सिडिजचा लोगो असणारी वर्तळातील त्रिकोणी चांदणी मात्र त्यांच्या लक्षात राहिली होती. त्या चांदणीने त्यांच्या मनात घर केलं आणि मग देवराजन यांचा तो स्वप्नप्रवास सुरु झाला.

वयाच्या आठव्या वर्षी पाहिलेलं हे स्वप्न तब्बल ८० वर्ष त्यांनी उराशी बाळगलं होतं. जेव्हा हे स्वप्न पूर्ण झालं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. जेव्हा मर्सिडिज बेंझ ट्रान्स कारने चेन्नईतील मर्सिडिज शोरुम कर्मचाऱ्यांना देवराजन यांच्या स्वप्नाची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी खास तयारी केली होती.

त्यांच्या आयुष्यातील या सर्वात मोठ्या क्षणाचं केक कापून सेलिब्रेशन करण्यात आलं. अत्यंत समारंभपूर्वक त्यांना कारची चावी देण्यात आली. विशेष म्हणजे हे सर्व क्षण ट्रान्स कार या मर्सिडिज शोरुमने कॅमेऱ्यात कैद केले असून युट्यूबवर व्हिडीओ रिलीज करण्यात आला आहे.

कारमध्ये बसल्यानंतर आपली स्वप्नपूर्ती झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. देवराजन आपलं हे स्वप्न पूर्ण झाल्याचं सर्व श्रेय आपल्या पत्नीला देतात. आपल्या पत्नीने स्पप्नाची कदर केली आणि पूर्ण पाठिंबा दिल्याचं ते सांगतात. देवराजन यांचा हा स्वप्न प्रवास इतरांसाठीही नक्कीच प्रेरणादायी आहे.