Menu

अपराध समाचार
कार-काळी पिवळीचा भीषण अपघात , 2 बालकांसह 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू

nobanner

गडचिरोलीमध्ये कार आणि काळी-पिवळी वाहनांचा भीषण अपघात झाला असून यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास जिमलगट्टापासून 5 किलोमीटरवर असलेल्या गोविंदगावच्या बस थांब्याजवळ हा अपघात झाला. मृतांमध्ये दोन बालकांसह सात जणांचा समावेश आहे. याशिवाय 5 जण जखमी असून जखमींना उपचारासाठी अहेरीच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूरच्या मित्तलवार कुटुंबातील लोक आपल्या सुझुकी बोलेनो कारने तेलंगणा राज्यातील प्रसिद्ध कालेश्वर मंदिरात दर्शनासाठी जात होते. याच वेळी सिरोंचावरुन मोहुर्ले कुटुंबीय घरचे सामान घेऊन मुरखेडाकडे येत होते. मात्र गोविंदगाव येथे दोन्ही वाहनांची भीषण टक्कर झाली आणि सात लोकांना जीव गमवावा लागला.

मृतांमध्ये मित्तलवार कुटुंबातील आई-वडीलांसह लहान मुलांचाही समावेश आहे. सहा आसनी रिक्षाचा चालक तसेच कारमधील दोन लहान बाळंही दगावली आहेत. मृतांमध्ये कमल मारोती मित्तलवार (35), मारोती केशवराव मित्तलवार (60), लता मारोती मित्तलवार (55), श्रीनीता कमल मित्तलवार (5 महिने), सरस संदीप मित्तलवार (दीड वर्ष) तसेच गडचिरोलीजवळील मुरखेडाचे रहिवासी असलेले काळीपिवळी वाहनातील निखिल देवराव मोहुर्ले (28) आणि चालक संदीप आनंदराव गडप (40) यांचा समावेश आहे. याशिवाय सीमा कमल मित्तलवार, अर्चना संदीप मित्तलवार, त्रिशा सुधीर अक्केवार, प्रतिमा देवराव मोहुर्ले आणि देवराव सखाराम मोहुर्ले हे जखमी आहेत. त्यांना अहेरीच्या उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले.