Menu

देश
बदलापूर-अंबरनाथला पावसानं झोडपलं, उल्हास नदी दुथडी भरुन

nobanner

बदलापूर-अंबरनाथ भागात काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे उल्हास नदी दुथडी भरुन वाहत असून पुरसदृष्य परिस्थितीमुळे रस्ते वाहतुकीवर जोरदार परिणाम झालेला दिसतोय. काल रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने अजुनही विश्रांती घेतलेली नाहीये, त्यामुळे अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड या भागात अंधारसदृष्य वातावरण झालं आहे. बदलापूरमध्ये उल्हास नदी दुथडी भरुन वाहत असून ग्रामीण भागातील कान्होर व इतर भागांमध्ये पाणी शिरलं आहे. बदलापूर पश्चिमेकडील बाजारपेठ भागात पाणी साचलं असून, अंबरनाथमध्येही काही सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. बदलापूर-टिटवाळा रस्त्यावरचा दापीवली पूल पाण्याखाली गेल्याची माहिती समोर येते आहे. त्यामुळे प्रशासनामार्फत लोकांना घराबाहेर न पडण्याचा संदेश दिला जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून उल्हास नदीच्या किनाऱ्यावर नगरपालिकेने पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना तैनात केलं आहे. बदलापूरमधील प्रसिद्ध कोंडेश्वर मंदिरातही पाणी शिरल्यामुळे या परिसरात पर्यटकांना जाण्यासाठी मनाई करण्यात आलेली आहे.

प्रशासनाने सोयीचा उपाय म्हणून कल्याण-मुरबाड रस्त्यावरील वाहतूक बंद केली असून ही वाहतूक आता टिटवाळ्यामार्गे वळवण्यात आलेली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या पावसाचा रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झाल्याचं कळतंय. विठ्ठलवाडी स्थानकातही पाणी साचल्यामुळे या भागात रेल्वे वाहतुक बदलापूर-कल्याण दरम्यान थांबवण्यात आल्याचं समजतंय. दुसरीकडे कर्जत भागातही जोरदार पाऊस होत असल्यामुळे अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्याचे मार्ग वळवण्यात आलेले आहेत. शनिवारचा दिवस असल्यामुळे अनेक चाकरमान्यांना सुट्टी असते. मात्र पावसाचा जोर पाहता अनेकांनी घरात राहणं पसंत केलं आहे.