देश
बारवी धरण तुडुंब!
ठाणे जिल्ह्य़ात गेल्या दोन महिन्यांपासून सरासरीच्या ७८.८२ टक्के पाऊस झाला असून शनिवारी रात्री बारवी धरण भरल्याने विसर्ग सुरू झाला आहे. भातसा धरणातील पाण्याची पातळीही झपाटय़ाने वाढत असल्याने किनारी असलेल्या गावकऱ्यांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे मोडकसागर, तानसा ही धरणे यापूर्वीच भरून वाहू लागली आहेत. सध्या भातसा धरणात ७६.१३ टक्के पाणी असून पाण्याची पातळी १३३.२३ मीटर इतकी आहे. या धरणाचा पाणीसाठा ७८ टक्के झाल्यावर १३४ मीटर एवढी पाण्याची पातळी होईल. यानंतर भातसा धरणाचे दरवाजे उघडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्य़ाचा जून ते ऑक्टोबर या कालावधीतील सर्वसामान्य पाऊस हा १७ हजार १५० मिमी इतका असतो. सध्या जिल्ह्य़ात १३ हजार ५१८ मिमी एवढी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच सुमारास ११ हजार ४६३ मिमी इतका पाऊस झाला होता. यापैकी ठाणे शहरात सरासरीच्या ८९ टक्के, कल्याणमध्ये ८२.८६ टक्के, मुरबाडमध्ये ६५.३२ टक्के, उल्हासनगरमध्ये ८३.३२ टक्के, अंबरनाथमध्ये ७८.५० टक्के, भिवंडीत ८८.६९ टक्के, शहापूरमध्ये ६३.७२ टक्के पाऊस झाला आहे.
बारवी धरणात सध्या ९८.७३ टक्के पाणीसाठा झाला आहे. आत्तापर्यंत बारवी परिसरात १६८८ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे.
धरणात २३०.१०० दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा झाला आहे. गेल्या पाच वर्षांत केवळ २०१७ मध्ये इतका जास्त म्हणजे २०२.६५ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा होता. सहा महापालिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणातून मोठय़ा प्रमाणात पाणी सोडावे लागत असल्याने जवळच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी रात्री बारवी धरण पूर्णत: भरले. या पाश्र्वभूमीवर धरण क्षेत्रातील तोंडली, कोळेवडखळ, जांभूळवाडी येथील गावांतील नागरिकांना रस्ते पाण्याखाली गेल्यास होडय़ा देणे तसेच इतर आवश्यक मदत महाराष्ट्र औद्य्ोगिक विकास महामंडळाकडून करण्यात येणार आहे.