देश
बिल्डरच्या हत्येचा कट फसला! गुरु साटम गँगच्या पाच जणांना अटक
मागच्या काही वर्षांपासून विजनवासात गेलेला अंडरवर्ल्ड डॉन गुरु साटम पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. पश्चिम उपनगरातील एका बिल्डरला खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी साटम गँगच्या पाच जणांना मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये मुंबई महापालिकेतील एका सफाई कामगाराचा समावेश आहे.
बिल्डर प्रोटेक्शन मनी म्हणजे खंडणी द्यायला तयार नसल्याने साटम गँगने त्याच्या हत्येचा कट रचला होता. महापालिकेत सफाई कामगार असणारा भारत सोलंकी (२५) हा मागच्या दोन आठवडयांपासून खंडणीच्या रक्कमेसाठी बिल्डरला फोन करत होता. पण धमकी देऊनही हा बिल्डर बधत नसल्याने अखेर गुरु साटमने त्याची हत्या करण्याचे आदेश दिले होते.
अटक केलेल्या पाच जणांकडून दोन पिस्तुल, पाच गोळया आणि अकरा सेलफोन जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त दिलीप सावंत यांनी दिली. भारत सोलंकी दिवसा महापालिकेत नोकरी करायचा त्यानंतरच्या फावल्या वेळात तो शहरात सुरु असलेल्या बांधकाम प्रकल्पांची माहिती जमवून आपल्या साथीदारांना देत होता. पोलिसांनी अमोल विचारे, राजेश आंब्रे, बिपिन धोत्रे आणि दीपक लोधिया या चौघांनाही अटक केली आहे.
पोलिसांनी साटम गँगच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल माहिती देताना सांगितले कि, सोलंकी धमकीसाठी फोन करायचा. धोत्रे आर्थिक व्यवहार संभाळत होता. पैसे मिळाल्यानंतर ते सर्व पैसे गुरु साटमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जायचे. तो सध्या परदेशात आहे. लोधिया शहरातील नव्या बिल्डर आणि व्यावसायिकांवर पाळत ठेऊन असायचा. विचारे आणि आंब्रे गँगचे शार्पशूटर होते.
अटक केलेल्या आरोपींपैकी अमोल विचारे आधी सुरेश मंचेकर गँगसाठी काम करायचा. परेलमधील बिल्डर महेंद्र खानविलकर यांच्या हत्ये प्रकरणी अमोल विचारेला अटक झाली होती. १० वर्ष शिक्षा भोगल्यानंतर अलीकडेच अमोल विचारेची सुटका झाली होती. आंब्रेच्या नावावरही वेगवेगळया पोलीस स्थानकात ५० गुन्हे दाखल आहेत.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.