देश
‘भाजपा हटाओ, देश बचाओ’ मोहिम सुरु करणार ममता बॅनर्जींची गर्जना
भाजपा हटाओ देश बचाओ या मोहिमेला १५ ऑगस्टपासून सुरुवात करणार असल्याची घोषणा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांचे रणशिंगच या घोषणेद्वारे ममता बॅनर्जी यांनी फुंकले आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तृणमूल काँग्रेसचा वार्षिक शहीद दिवस असल्याने आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत त्या बोलत होत्या. एकीकडे ममता बॅनर्जी यांनी ही घोषणा केली असतानाच तिकडे भाजपालाही एक मोठा धक्का बसला. कारण भाजपाचे नेते चंदन मित्रा यांनी आज भाजपाला जय श्रीराम करत टीएमसीमध्ये प्रवेश केला.
१५ ऑगस्टपासून आपण भाजपा हटाओ देश बचाओ या मोहिमेला सुरूवात करणार आहोत. २०१९ च्या निवडणुका लक्षात घेऊन या मोहिमेच्या रूपातून एक मोठा प्रहार भाजपावर करायचा आहे असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काही चांगली माणसे आहेत मी त्यांचा आदर करते. मात्र काही जणांकडून अत्यंत गलिच्छ राजकारण करणे सुरू आहे असेही ममता बॅनर्जींनी म्हटले आहे. देशभरातून मॉब लिंचिंग अर्थात जमावाकडून मारहाणीच्या घटना समोर येत आहेत. यातून लोकांमध्ये तालिबानी निर्माण करायचे आहेत का? असा प्रश्नही ममता बॅनर्जींनी विचारला.
एवढेच नाही तर आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसला ४२ जागांवर विजय मिळेल असाही विश्वास ममता बॅनर्जींनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगालच्या मिदनापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी काही समाज विघातक समूहाच्या हाती पश्चिम बंगालचा कारभार दिला गेला आहे लोक त्यांच्या दहशतीत आहेत असा आरोप केला होता. या आरोपांना आज ममता बॅनर्जींनी उत्तर दिले. लोक इतके दहशतीत आहेत की बंगालमध्ये पूजा करणेही कठीण होऊ बसले आहे अशी टीकाही मोदींनी केली होती. मात्र पंतप्रधान बंगालच्या लोकांची दिशाभूल करत होते असे म्हणत ममता बॅनर्जींनी भाजपा हटाओ देश बचाओ मोहिमेचा नारा दिला.