Menu

देश
मध्य रेल्वेवर कर्जतजवळ रेल्वे रुळांवर पाणी, लांब पल्ल्यांच्या गाड्यांना फटका

nobanner

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेलाही फटका बसला असून कर्जत- चौक दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लांब पल्ल्यांच्या एक्स्प्रेस गाड्यांची सेवा विस्कळीत झाली आहे. भुसावळ – पुणे एक्स्प्रेस कल्याण – कर्जत मार्गावरुन तर पुणे – भुसावळ एक्स्प्रेस दौंड- मनमाड मार्गावरुन पळवण्यात आली आहे. तर कल्याण – कर्जत मार्गावर विठ्ठलवाडीजवळ रेल्वे रुळावर पाणी साचल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

मुंबई, ठाणे, वसई- विरार आणि रायगड या भागांना मुसळधार पावसाने झोडपले असून पावसामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक विलंबाने सुरु आहे. मध्य रेल्वेवरील लोकल गाड्यांची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु आहे. तर कर्जत – चौक दरम्यान रुळावर पाणी साचल्याने या मार्गावरील वाहतूक मंदावली आहे. रुळांवर जवळपास १० ते ११ सेंमी. पाणी साचल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात आले आहे.

कर्जत – चौक दरम्यान रुळावर पाणी साचल्याने ११०२५ भुसावळ- पुणे एक्स्प्रेस कल्याण- कर्जत मार्गावरुन वळवण्यात आली आहे. तर ११०२६ पुणे- भुसावळ एक्स्प्रेस दौंड – मनमाडमार्गे वळवण्यात आली आहे. तर १२१२६ प्रगती एक्स्प्रेस आणि १७६१४ नांदेड – पनवेल एक्स्प्रेसही कर्जत – पनवेलऐवजी कर्जत – कल्याण मार्गावर वळवण्यात आली आहे. माथेरान – अमन लॉज दरम्यानही रुळावर झाड पडल्याची माहिती रेल्वेतर्फे देण्यात आली आहे.