Menu

देश
मराठा आंदोलनात मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह भाषेत घोषणाबाजी

nobanner

मराठ्यांना आरक्षण द्यावे या मागणीसाठी आज मुंबईसहीत ठाणे, नवी मुंबई, पनवेल, सातारा, नाशिकमध्ये बंदची हाक देण्यात आली. अनेक ठिकाणी सकाळपासून कार्यकर्ते रस्त्यांवर उतरले असून त्यांनी जागोजागी वाहतूक अडवून ठेवली. ठाण्यात रेल रोकोही करण्यात आले. तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी या अहिंसक आंदोलनाला तोडफोडीचे गालबोट लागले. मोठ्या संख्येने मराठा समाजातील कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. भगवे झेंडे, मराठा क्रांती मोर्च्याचा भगव्या गांधी टोप्यांबरोबरच शिवरायांचा फोटो असणारे झेंडेही आंदोलकांच्या हाती दिसत होते. याशिवाय अनेक ठिकाणी काकासाहेब शिंदेंना श्रद्धांजली देणारे बॅनर्सही दिसून आले.

आरक्षणाच्या मागणीसाठी मागील वर्षभरापासून राज्यभरात ५८ मूक मोर्चा काढणाऱ्या मराठा समाजाने आता खूप झालं म्हणत आता मूक नाही ठोक मोर्चा असा पवित्रा घेतल्याचे चित्र या आंदोलनात दिसले. हे आंदोलन तोडफोड न करता अहिंसक पद्धतीने केले जाईल असे आश्वासन देण्यात आले होते मात्र अनेक जागी तोडफोड झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. पहिल्यांदाच अशाप्रकारचे मूक मोर्चा न काढता घोषणाबाजी करत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चे काढले आहेत. यामध्ये अगदी मुख्यमंत्र्यांपासून ते आरक्षण घेण्याबद्दलच्या अनेक घोषणा मोर्चेकरी देताना दिसले. या मोर्चांमध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामधील काही घोषणा होत्या…

आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं…

या सरकारचं करायचं काय… खाली डोकं वर पाय…

कोण म्हणतो देणार नाय… घेतल्याशिवाय राहणार नाय…

तुमचं आमचं नात काय… जय जिजाऊ जय शिवराय…

एक मराठा लाख मराठा…

जय जिजाऊ जय शिवराय

छत्रपती शिवाजी महाराज की जय…

जय भवानी… जय शिवाजी…

अपशब्द वापरूनही घोषणाबाजी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्य सरकारवरील राग व्यक्त करताना अनेक ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पातळी सोडून अपशब्द वापरत मुख्यमंत्र्यांविरुद्ध घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे महिला कार्यकर्त्याही या घोषणाबाजीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या पाहायला मिळाल्या.

काकासाहेब शिंदेना श्रद्धांजली

‘अमर रहे… अमर रहे.. काकासाहेब शिंदे अमर रहे…’ तसेच ‘जब तक सुरज चाँद रहेगा काकासाहेब तेरा नाम रहेगा.’ अशा घोषणाही कार्यकर्त्यांनी दिल्या. औरंगाबादमध्ये जलसमाधी आंदोलनात नदीत उडी मारून आत्महत्या कारणारे मराठा सामजातील काकासाहेब शिंदे यांना मोर्चेकऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली. काकासांहेबांना श्रद्धांजली देणारा एक बॅनरही आजच्या आंदोलनात दिसत होते. यावर काकासाहेबांचा फोटो छापण्यात आला होता.