Menu

देश
…म्हणून आजच्या चाणक्याचा खटाटोप सुरूये, अमित शाहंवर उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका

nobanner

हिंदूंची एकजूट जोपर्यंत आपण फोडणार नाही, तोपर्यंत आपली डाळ शिजणार नाही हे आजच्या चाणक्यांना वाटत असेल, त्यासाठीच ते साम-दाम-दंड-भेद हा प्रकार करत असतील, अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचं नाव न घेता केली. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी याबबात भाष्य केलं आहे.

जे गुजराती आणि महाराष्ट्राचे लोक सातत्याने भाऊ-भाऊ म्हणून राहिले, त्यांच्यामध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला होता. त्यावर उत्तर देताना उद्दव म्हणाले, ”९२-९३ च्या मुंबईत उसळलेल्या दंगलीत मराठी माणसांनी आणि शिवसैनिकांनी… होय, मी अभिमानाने सांगतोय मराठी माणसांनी, शिवसैनिकांनी तेव्हा मुंबईतील तमाम हिंदूंचं रक्षण केलं. नाहीतर त्या हिंदू-मुसलमान दंगलीत मराठी शिवसैनिक का पकडला गेला, मग हा हिंदू आहे तरी कोण जो दंगल करतो… पळून जातो… आणि दिसतही नाही. त्या वेळेला गुजराती, उत्तर भारतीय या सगळ्या माता-भगिनींचे रक्षण शिवसैनिकांनी केले ते केवळ हिंदू म्हणून. त्यावेळी जी हिंदुत्व म्हणून एकजूट झाली होती ती त्यावेळेला काँग्रेसला भारी पडली होती. हिंदू म्हणून शिवसेनाप्रमुखांनी त्यावेळी ही एकजुटीची वज्रमूठ करून दाखवली होती. हिंदूंची ही एकजूट जोपर्यंत आपण फोडणार नाही तोपर्यंत आपली डाळ शिजणार नाही हे जर आजच्या चाणक्यांना वाटत असेल, त्यासाठीच ते साम-दाम-दंड-भेद हा प्रकार करत असतील. आताचे जे काही चाणक्य स्वतःला समजताहेत त्यांची ही भेदनीती आहे का याचा तमाम हिंदूंनी विचार करावा. एक गोष्ट लक्षात घ्या. त्यावेळी शिवसेनाप्रमुख आणि शिवसैनिकांनी हातात कोणतीही सत्ता नसताना पोलिसांचा वापर न करता हिंदूंना वाचवलं होतं. स्वतःच्या जिवावर उदार होऊन हे विशेष. अनेकांनी त्यावेळी लाठय़ा, काठय़ा खाल्ल्या, गोळ्या झेलल्या, अनेकांच्या केसेस आत्ताआत्तापर्यंत सुरू होत्या. हे सगळं त्यांनी कोणासाठी भोगलं. कोणासाठी सोसलं? त्यांना स्वतःचीही आयुष्यं होती ना? स्वतःचं कुटुंबही होतं. पण घरदार न बघता हिंदूंच्या, हिंदुस्थानच्या रक्षणासाठी ते रस्त्यावर उतरले. समोरून कोण अंगावर येतंय.. तो किती सशस्त्र आहे याची पर्वा न करता तो त्यांना भिडला होता आणि आपल्याला वाचवलं होतं. हे निदान अपप्रचाराला बळी पडणाऱयांनी आठवावं”.

या मुलाखतीत उद्धव यांनी केंद्रातील मोदी सरकारची धोरणं, राष्ट्रीय राजकारण, भाजपाची भूमिका, छत्रपती शिवरायांचं स्मारक, शेतकऱ्यांचं आंदोलन यांसारख्या विविध विषयांवर परखड भाष्य केलं आहे.