खेल
World Badminton Championship – समीर वर्माची आगेकूच, फ्रान्सच्या लुकास कोरवीवर मात
जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी चांगली सुरुवात केली आहे. एकेरी आणि दुहेरीच्या सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंनी आपले पहिल्या फेरीतले सामने जिंकले आहेत. पुरुषांमध्ये प्रणॉय पाठोपाठ समीर वर्मानेही आपल्या पहिल्या फेरीचा सामना जिंकला आहे. समीरने फ्रान्सच्या लुकास कोरवीवर सरळ दोन सेट्समध्ये मात केली. २१-१३, २१-१० अशा दोन सेट्समध्ये समीरने हा सामना आपल्या खिशात घातला. अवघ्या ४० मिनीटात समीरने आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूला मात दिली. समीरच्या आक्रमक खेळापुढे कोरवीचा निभावच लागला नाही.
पुरूष दुहेरीत मनू अत्री आणि बी सुमिथ रेड्डी या जोडीने बल्गेरीयाच्या डॅनियल निकोलोव्ह आणि इव्हान रूसेव्हचा २१-१३, २१-१८ असा पराभव केला. महिला दुहेरीत संयोगिता घोरपडे आणि प्राजक्ता सावंत या भारतीय जोडीला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. तुर्कीच्या बेंगीस इर्सेटीन आणि नॅझलिकॅन इंसी यांनी २२-२०, २१-१४ अशा फरकाने भारतीय जोडीला हार मानण्यास भाग पाडले. दुसरीकडे मिश्र दुहेरी स्पर्धेतही सत्विक रणकिरेड्डी आणि आश्विनी पोनाप्पा जोडीने आपल्या प्रतिस्पर्ध्यांची कडवी झुंज मोडून काढत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला.