देश
आरएसएसचं दहशतवादी मुस्लीम ब्रदरवुडशी साम्य – राहूल गांधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भारताचा आत्माच बदलायचा असून अन्य कुठल्याही संघटनांनी भारतातल्या संस्थांवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला नसल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी केला आहे. लंडनमध्ये इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ स्ट्रेटेजिक स्टडीज येथे शुक्रवारी ते बोलत होते. गांधी हे सध्या जर्मनी व इंग्लंडच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. मुस्लीम ब्रदरहूड या अनेक अरब देशांनी दहशतवादी म्हणून जाहीर केलेल्या संघटनेशी गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना केली. मुस्लीम ब्रदरवुडच्या संकल्पनेशी आरएसएसची संकल्पना मिळतीजुळती असल्याचा आरोप यावेळी गांधी यांनी केला आहे.
भारतातल्या दिग्गजांनी ज्या संस्थांची गेल्या काही दशकांमध्ये उभारणी केली आहे, त्या संस्थांवर आज हल्ले होत असल्याचे गांधी म्हणाले. “पाश्चिमात्य देशांचा 1947 मध्ये भारत स्वतंत्र देश म्हणून उभा राहू शकतो यावर विश्वास नव्हता, परंतु भारतानं पाश्चात्य देशांना चुकीचं ठरवलं आहे. हजारो लोकांनी संस्था उभ्या केल्या ज्यामुळे भारताची उभारणी झाली. आज या संस्थांवरच आघात होत आहेत,” गांधी म्हणाले.
याआधी बर्लिनमध्ये बोलताना भाजपा व आरएसएस भारतीय जनतेमध्ये फूट पाडत असल्याचा आरोप राहूल गांधींनी केला होता. आमच्या देशामध्ये ते विद्वेश पसवरत असून आमचं काम लोकांना एकमेकांशी जोडण्याचं असल्याचे गांधी म्हणाले. पुरोगामी असणं ही आमची संस्कृती आहे, ही तुमची संस्कृती आहे आणि याच दिशेने भारतानं पुढे जावं असं काँग्रेसला वाटत असल्याचं गांधी यांनी सांगितलं. भलीमोठी भाषणं आपण ऐकली आहेत, परंतु शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत किंवा तरूणांना भविष्याचा मार्ग दिसला असं काही झालं नाही अशी टिकाही त्यांनी भाजपावर केली आहे.