Menu

देश
खूशखबर ! मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं ९० टक्के भरली

nobanner

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली असून धरणांच्या पातळीत वाढ झाली आहे. पावसाळा संपण्यासाठी अद्याप दीड महिना शिल्लक असतानाच धरणं ९० टक्के भरली असून मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. धरणं भरली असल्या कारणाने मुंबईकरांना पाणीकपातीला सामोरं जावं लागणार नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांची पातळी ९० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. अर्ध्या मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारं भातसा धरण ८४ टक्के भरलं आहे.

यासोबतच अजून एक खुशखबर असून हवामान विभागाने पुढील दोन दिवसात चांगला पाऊस पडण्याची तसंच विकेण्डला मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

मुंबईला दिवसाला ४,२०० दशलक्ष लीटर पाण्याची आवश्यकता असते. तर महापालिका मोडक सागर, तुलसी, विहार, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसा धरणातून शहराला ३,८०० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा करतं. बुधवारी सातही धरणात १२ लाख ९४ हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा होता. गतवर्षी याच दिवशी हा पाणीसाठा १३ लाख ५ हजार दशलक्ष लीटर होता. तर २०१६ मध्ये १२ लाख ९६ हजार दशलक्ष लीटर होता.

मुंबईला पाणीकपातीचं संकट टाळण्यासाठी १ ऑक्टोबरपर्यंत १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर पाण्याची आवश्यकता आहे. तुलसी, विहार, मोडक सागर आणि तानसा जुलै महिन्यातच भरुन वाहत असून मध्य वैतरणा ९६ टक्के भरलं आहे. अप्पर वैतरणा ८१ टक्के पूर्ण भरलं असून भातसा ८४ टक्के भरलं आहे. १ ऑक्टोबरला दोन्ही धरणं भरुन वाहतील अशी अपेक्षा आहे.