देश
टंचाईचे संकट कायम
* गतवर्षीच्या तुलनेत जलसाठय़ात १४ टक्क्यांनी घट
* पावसाळ्यात ५१ टँकरने पाणीपुरवठा
बहुतांश भागातून पावसाने दडी मारली असून पावसाळ्याच्या मध्यावर अनेक भागांत पाणीटंचाईचे संकट कायम आहे. जिल्ह्य़ातील २४ धरणांमध्ये सद्य:स्थितीत ३९ हजार ४२७ दशलक्ष घनफूट अर्थात ६० टक्के जलसाठा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण १४ टक्क्यांनी कमी आहे.
प्रारंभीच महिनाभर प्रतीक्षा करायला लावणाऱ्या पावसाचे नंतर आगमन झाले. परंतु काही दिवस आणि काही विशिष्ट भागातच जोरदार हजेरी लावत तो पुन्हा अंतर्धान पावला. मागील १५ दिवसांपासून काही अपवाद वगळता मुसळधार पाऊस झालेला नाही. पूर्व भागातील टंचाईग्रस्त गावांना ५१ टँकरद्वारे पाणी दिले जात आहे. आतापर्यंत जिल्ह्य़ात ९०३६ मिलिमीटर पाऊस झाला. त्यात कमालीचा विरोधाभास राहिला.
आजवर केवळ इगतपुरी (२२७९), पेठ (१६६१), सुरगाणा (१४६३), त्र्यंबकेश्वर (११२६), नाशिक (४३५) या पाच तालुक्यांत आधिक्याने पावसाची नोंद झाली. उर्वरित दहा तालुक्यांमध्ये त्याचे प्रमाण ११० ते ३०० मिलिमीटरच्या दरम्यान आहे. नांदगाव, मालेगाव, देवळा, येवला, बागलाण अशा काही तालुक्यांत तर पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. या सर्वाची परिणती समाधानकारक जलसाठा न होण्यात झाल्याचे दिसून येते. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी त्यास दुजोरा दिला.
गंगापूर, दारणा धरण समूह वगळता उर्वरित गिरणा, पालखेड धरण समूहात समाधानकारक जलसाठा नसल्याचे त्यांनी सूचित केले. गंगापूर धरण समूहात सध्या ८६ टक्के जलसाठा आहे. त्यात गंगापूर, काश्यपी, गौतमी गोदावरी, आळंदी धरणांचा समावेश होतो. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ४३९२ दशलक्ष घनफूट जलसाठा आहे. इगतपुरी तालुक्यात पावसाचा सर्वाधिक जोर राहिला. यामुळे त्या भागातील धरणांमध्ये सर्वाधिक जलसाठा आहे. दारणा धरणात ६१४३ (८६ टक्के), भावली १४३४ (१००), मुकणे ३३३१ (४६), वालदेवी ११३३ (१००), कडवा १३४३ (८०) असा जलसाठा आहे.
समाधानकारक पावसाअभावी पालखेड धरण समूह, गिरणा खोऱ्यातील धरणांमध्ये अपेक्षित जलसाठा होऊ शकला नाही. पालखेड धरणात २३१ (३५ टक्के), करंजवण आणि वाघाड ८६ टक्के जलसाठा आहे. पालखेड धरण समूहात एकूण ८२ टक्के जलसाठा आहे. जलसाठय़ाची बिकट स्थिती गिरणा खोऱ्यात आहे. चणकापूर, हरणबारी, केळझर धरण वगळता गिरणा धरणात ५१४५ दशलक्ष घनफूट (२८ टक्के), पुनद ६२२ (४८) जलसाठा आहे. जिल्ह्य़ातील एकूण २४ धरणांमध्ये सध्या ३९ हजार ४२७ दशलक्ष घनफूट (६०) जलसाठा आहे. गेल्या वर्षी याच काळात हा जलसाठा ४८ हजार ८५० म्हणजे ७४ टक्के इतका होता. यंदा त्यात १४ टक्क्यांनी घट झाली आहे.
जिल्ह्य़ातील पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष भेडसावणाऱ्या गावांना ५१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ज्या गावातून टँकरची मागणी येईल, तिथे त्याची पूर्तता करण्याचे निर्देश स्थानिक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.