दुनिया
डोकलाम वादाच्या वर्षपूर्तीला चीनची मुजोरी, आता लडाखमध्ये घुसखोरी
डोकलाम वादाला एक वर्ष पूर्ण होत असतानाच चीनने पुन्हा एकदा मुजोरी दाखवत भारतीय हद्दीत घुसखोरी केली. लडाखमध्ये डेमचॉक भागात चिनी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून भारतीय हद्दीत ३०० ते ४०० मीटर अंतरापर्यंत घुसखोरी केली. यावर कळस म्हणजे चिनी सैन्याने तिथे पाच तंबूही उभारले.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चिनी सैन्याने लडाखमध्ये भारतीय हद्दीत घुसखोरी केली. भारतीय सैन्याने चिनी सैनिकांना विरोधही दर्शवला. मात्र, यानंतरही चिनी सैन्याने घुसखोरी केली. चिनी सैनिकांनी पाच तंबूही उभारले.
अखेर भारतीय सैन्य आणि चिनी सैन्यातील ब्रिगेडियर दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर चीनने पाच पैकी तीन तंबू हटवले. तर दोन तंबू आणि चिनी सैन्यातील काही जवान अजूनही तिथेच आहेत, अशी माहिती समोर आली आहे. भारतीय सैन्याने या वृत्ताबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
भारत आणि चीनमध्ये ज्या २३ जागांवरुन वाद आहे त्यामध्ये डेमचॉकचाही समावेश आहे. डेमचॉकमध्ये यापूर्वीही भारत आणि चिनी सैन्य आमने- सामने आले आहेत. या वर्षभरात चीनने १७० वेळा भारतीय हद्दीत घुसखोरी केली असून २०१६ मध्ये हेच प्रमाण २७२ तर २०१७ मध्ये ४२६ इतके होते.