देश
धावत्या लोकल ट्रेनमध्ये टवाळखोरांची स्टंटबाजी, मोबाईल चोरीचा प्रतापही कॅमेऱ्यात कैद
मुंबईची लाइफलाइन असणाऱ्या लोकल ट्रेनमधील स्टंटबाजी हा आता काही नवीन विषय राहिला नाही. त्यातही हार्बर मार्गावर अशी स्टंटबाजीचे प्रकार वरचेवर होताना दिसतात. अशाच एका स्टंटबाजीची घटना रविवारी पुन्हा एकदा समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार रविवारी दुपारच्या सुमारास हार्बर मार्गवरील जीटीबी स्थानक आणि चुनाभट्टी स्थानकादरम्यानच्या प्रवासातील जीवघेण्या स्टंटबाजीचा व्हिडीओ समोर आला आहे.
सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दिसणारे टवाळखोर नक्की कोण आहेत याबद्दलची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या व्हिडीओ स्टंट करणाऱ्यांपैकीच एकाने सेल्फी कॅमेराने शूट केलेला दिसत असून चौघांपैकी एकजण धावत्या ट्रेनच्या छतावर चढताना दिसत आहे. तर इतरजण दरवाजाला आणि खिडकीला लटकल्याचे या व्हिडीओत दिसत आहे.
मोबाईल चोरीही व्हिडीओत कैद
या हुल्लडबाजांनी प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या प्रवाशाचा मोबाइल हिसकावल्याचेही या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. व्हिडीओमध्ये जीटीबी स्थानकात या चौघांपैकी एकजण उतरलेला दिसतो. तसेच ट्रेन सुरु झाल्यावर ती वेग पकडू लागते तसा काळ्या टी-शर्टमधील हा तरुण धावू लागतो. त्याच वेळी त्याच्या टोळीतील एकजण दरवाजाला लटकून बाहेर झेपावत प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या एका व्यक्तीचा मोबाईल हिसकावून घेतो. हा संपूर्ण घटनाक्रमही या व्हिडीओत कैद झाला आहे.
पोलिस म्हणतात कारवाई होणार
चोरीची घटना कैद झालेल्या या स्टंटबाजीच्या व्हिडीओबद्दल ‘मिड-डे’शी बोलताना वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोंडे यांनी या व्हिडीओतील स्टंटबाजांवर कारवाई केली जाईल अशी माहिती दिली. या व्हिडीओमधील स्टंटबाजांची ओळख पटवून आम्ही त्यांच्यावर करावाई करु. तसेच हा व्हिडीओ कधी शूट कऱण्यात आला आहे याची संपूर्ण माहिती काढली जाईल. आम्ही अशाप्रकारे स्टंट करणाऱ्यांविरुद्धची मोहिम सतत राबवत असतो. आणि या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतील स्टंटबाजांवर नक्कीच कारवाई करु अशी माहिती भालोंडे यांनी दिली. पोलिसांनी या चौघांचा शोध सुरु केला आहे.
अशा हुल्लडबाजांवर कारवाई करण्याची मागणी अनेकदा प्रवाशी संघटनांकडून होते. मात्र पोलिस, जीआरपीएफचे जवान अनेक स्थानकात असले तरी अशाप्रकारच्या स्टंटबाजीला लगाम लागताना दिसत नाहीय. अशाप्रकारे स्टंटबाजी करुन हे लोक स्वत:चा जीव तर धोक्यात घालतातच पण इतर सहप्रवाशांचाही जीव धोक्यात घालतात.
अशा हुल्लडबाजीमुळे आठवड्याभरापूर्वी ट्रॅकमॅनचा गेला जीव
काही दिवसापुर्वीच अशाच एका हुल्लडबाज प्रवाशाने महालक्ष्मी आणि लोअर परळ या स्थानकांदरम्यान धावत्या ट्रेनच्या दारातून लाथ मारल्याने श्रावण सानप या ट्रॅकमनचा मृत्यू झाला होता. अशाप्रकारची हुल्लडबाजी कमी अधिक प्रमाणात रेल्वेच्या सर्वच उपनगरीय मार्गांवर होते मात्र हार्बर मार्गावर अशा घटनांचे प्रमाण आधिक आहे.