देश
नंदमुरी हरिकृष्ण यांच्या जीवावर बेतला गाडीचा वेग; ताशी १६० किमी वेगाने चालवत होते कार
ज्येष्ठ अभिनेते आणि तेलगु देसम पार्टीचे नेते नंदमुरी हरिकृष्ण यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य कलाविश्वातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी सकाळी ६ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास एका भीषण अपघातात त्यांची कार रस्त्यावरील दुभाजकावर आदळली आणि हरिकृष्ण यांना यामध्ये जबर दुखापत झाली.
दरम्यान, या त्यांना लगेचच रुग्णालयात नेण्यात आलं. पण, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं होतं. नालगोंडा येथील पोलीस अधिक्षक ए.व्ही. रंगनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार हरिकृष्ण यांच्यासोबत त्यावेळी कारमध्ये आणखी दोन व्यक्तीही उपस्थित होत्या.
‘पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास फॉर्च्युनर कारने ते हैदराबाद येथून नेल्लोरच्या दिशेने निघाले होते. नारकेटपल्लीजवळील चित्याल भागातून पुढे गुंटूर महामार्गाच्या दिशेने जात असतेवेळीच १२ पोलिस बटालियन ग्राऊंडजवळ त्यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार जाऊन थेट दुभाजकावर आदळली. अपघातावेळी कारचा वेग जवळपास ताशी १६० किमी इतका होता. भरधाव वेगात असल्यामुळे त्यांची कार दुभाजकावर आदळून पुन्हा समोरुन येणाऱ्या कारवर धडकली’, असं रंगनाथ म्हणाले. सध्याच्या घडीला संबंधित भागातील पोलीस यंत्रणा या अपघाताच्या सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचं कळत आहे.
हरिकृष्ण यांच्यासोबत कारमध्ये असणाऱ्या दोन्ही व्यक्तींनाही दुखापत झाली असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला भरधाव वेगात कार चालवणं हरिकृष्ण यांच्या जीवाशी बेतलं असून, दाक्षिणात्य कलाविश्वावर शोककळा पसरल्याचं चित्र आहे.