Menu

देश
मराठा आरक्षणासाठी आज महाराष्ट्र बंदची हाक

nobanner

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. सकल मराठा समाजाने महाराष्ट्र बंदची हाक दिली असून मराठा आंदोलकांकडून मुंबईतही बंद पाळण्यात येणार आहे. मुंबईतील ‘मराठा क्रांती महामोर्चा’ या बंदचे नेतृत्व करणार आहे. सुरुवातीला मुंबईला बंदमधून वगळण्यात आल्याचं सांगण्यात आल्याने बुधवारी रात्री उशिरापर्यंत गोंधळाचं वातावरण होतं.

नाशिक, ठाणे आणि नवी मुंबई या तीन शहरांत बंद पाळला जाणार नसून सुरक्षेच्या कारणास्तव ठाणे-नवी मुंबईतील शाळा मात्र बंद ठेवल्या जाणार आहेत.

दूध, शाळा-महाविद्यालये आणि वैद्यकीय सेवांना या बंदमधून वगळण्यात आले असून बंद सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत असेल, असे जाहीर करण्यात आले आहे. २५ जुलै रोजी झालेल्या मराठा क्रांती मोर्चादरम्यान नवी मुंबई आणि ठाणे शहरात परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. त्यामुळे या दोन्ही शहरांत गुरुवारी बंद पाळण्यात येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

पंंढरपुरात इंटरनेट सेवा बंद
पंढरपुरमध्ये आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

सीएसएमटी स्थानकावर शुकशुकाट
नेहमी प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या सीएसएमटी स्थानकावर आज शुकशुकाट पहायला मिळतोय

मुंबईतील रेल्वे सेवा सुरळीत
बंदचा अद्याप रेल्वे सेवेवर कोणताही परिणाम झालेला नसून सुरळीत सुरु आहे. मध्य रेल्वेवर नेहमीपेक्षा आज कमी गर्दी असून अनेकांनी घरीच थांबणं पसंत केलं आहे.

बंदचा परिणाम हिंजवडीतील आयटी कंपन्यावर जाणवतोय. बहुतांश कंपन्या बंद आहेत तर काही कंपन्यांनी ‘वर्क फॉर होम’चा पर्याय अवलंबला आहे. ज्यांना ऑफिसला येणं गरजेचं होतं त्यांनी नऊच्या आधीच ऑफिस गाठलं आहे. हिंजवडीत एकूण १२० छोट्या-मोठ्या कंपन्या असून इथे साडे तीन लाख कर्मचारी काम करतात.

सोलापुरात आंदोलनाला सुरुवात
मराठा आंदोलकांनी माढा-शेटफळ मार्गावर चक्काजाम आंदोलन केलं आहे. बाभळीची झाडे आणि टायर पेटवून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. मोटरसायकल रॅली काढून आंदोलनाला सुरुवात.

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट बंद राहणार
नवी मुंबईला बंदमधून वगळण्यात आलं असलं तरी एपीएमसी मार्केट बंद राहणार आहे.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन
मुंबईतील मराठा आंदोलक कार्यकर्त्यांमध्ये फूट पडल्याचे चित्र दिसत आहे. काही कार्यकर्त्यांना बंद व्हावा असे वाटत आहे. तर काहींनी ठिय्या आंदोलनाद्वारे रोष व्यक्त करण्याची कल्पना मांडली. त्यानुसार गुरुवारी कार्यकर्त्यांचा एक गट वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सकाळी ११ ते २ या कालावधीत ठिय्या आंदोलन करणार आहे. तर दुसरा गट बंद पुकारणार आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी शाळा बंद
मुंबईत शिक्षण विभागाने अधिकृतपणे शाळा बंद करण्याच्या सूचना दिलेल्या नाहीत. मात्र, अनेक ठिकाणी खबरदारी म्हणून शाळा प्रशासनानेच शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाण्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त
ठाण्याला बंदमधून वगळण्यात आलं असलं तरी सुरक्षेच्या दृष्टीने तीन हात नाका येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे

नागपुरातही सर्व शाळांना सुट्टी
नागपुरातील सर्व खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

ठाणे, पुणे, औरंगाबादमध्ये आज शाळा बंद
सुरक्षेच्या दृष्टीने पुणे, औरंगाबाद आणि ठाण्यातील शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे

लातूरमध्ये मध्यरात्री रास्ता रोको
लातूरमध्ये मध्यरात्रीच आंदोलनाला सुरुवात झाली असून मराठा आंदोलकांनी लातूर – बार्शी – पुणे रस्ता रोखला