देश
वैभव राऊत सनातनचा साधक नसून एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता, सनातनच्या वकिलांचा दावा
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) धाड टाकून अटक केलेला वैभव राऊत हा सनातनता साधक नसून एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे असा दावा सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांनी केला आहे. यासोबतच वैभव राऊत याने असं काही केलं असावं असं मला वाटत नाही. त्याच्या घरी स्फोटकं सापडणं शक्य नाही. त्याला लागेल ती सर्व मदत करु असं सांगताना पोलिसांवर आणि गृहखात्यावर आमचा विश्वास नाही. गृहमंत्री जाणूनबुजून हे घडवत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. सनातनच्या कार्यकर्त्यांना वारंवार त्रास दिला जातो तसंच मुख्यमंत्री वारंवर संस्थेला बदनाम करत आहेत असंही ते म्हणाले आहे.
एटीएसने नालासोपारा येथून वैभव राऊत याला अटक केली असून त्याच्या घरातून आणि दुकानात काही संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्याचा सनातन संस्थेशी संबंध असल्याचा दावा करण्यात येत होता.
नालासोपारा येथील भांडारआळी परिसरात वैभव राऊत याच्या घरावर आणि दुकानावर एटीएसच्या पथकाने गुरुवारी रात्री उशिरा छापा घातला. पोलिसांच्या पथकाला तिथे संशयास्पद साहित्य सापडले असून ते जप्त करण्यात आले आहे. यात स्फोटकं बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा समावेश आहे. तसंच आठ देशी बॉम्बही मिळाले आहेत. पोलिसांनी वैभव राऊतला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरु आहे.