Menu

देश
जेएनयूत पुन्हा ‘लाल सलाम’! ‘लेफ्ट युनिटी’ची बहुमताकडे वाटचाल

nobanner

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघाच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा डाव्या संघटनांच्या ‘लेफ्ट युनिटी’ ला स्पष्ट बहुमत मिळण्याची चिन्हं आहेत. मतमोजणीमध्ये विद्यार्थी संघाच्या चारही महत्वाच्या पदांवर ‘लेफ्ट युनिटी’ आघाडीवर असून स्पष्ट बहुमताकडे त्यांची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे जेएनयूमध्ये पुन्हा एकदा ‘लाल सलाम’च्या घोषणा ऐकायला मिळू शकतात. शनिवारी झालेल्या तोडफोडीमुळे येथे मतमोजणी थांबवण्यात आली होती, पण सध्या तणावपूर्ण परिस्थितीत येथे मतमोजणी सुरू आहे.

विद्यार्थी संघाच्या चार महत्वाच्या पदांसाठी शुक्रवारी मतदान झालं होतं. नंतर काल मतमोजणीला सुरूवात झाली असताना मध्येच गदारोळ झाला. येथे मतपेट्या पळवून नेण्याचा प्रयत्न झाला होता आणि तोडफोडही झाली होती. त्यानंतर मतमोजणी रद्द करण्यात आली होती. अभाविपच्या विद्यार्थ्यांनी ही तोडफोड केली, असा आरोप डाव्या संघटनांकडून करण्यात आला आहे.

निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार याचे चित्र पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. मात्र, डाव्यांचा गड सर करण्यासाठी पूर्ण ताकद लावणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला दुसऱ्या क्रमांकावर समाधन मानावं लागेल असं दिसतंय. तर, ‘बिरसा फुले आंबेडकर स्टुडेंट असोसिएशन’ (बापसा) तिसऱ्या स्थानावर राहण्याची शक्यता आहे.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डाव्या संघटनांचा एन. साई बालाजी हा आघाडीवर आहे, तर उपाध्यक्षपदासाठीही डाव्या संघटनांच्या सरिका चौधरी, महासचिवपदासाठी डाव्या संघटनांचा एजाज अहमद राथेर आणि संयुक्त सचिवपदासाठीही डाव्या संघटनांचाच अमुथा जयदीप हे आघाडीवर आहेत.