देश
…तरच भारताला हरवणं शक्य – सरफराज अहमद
आशिया चषकात पाकिस्तानने हाँग काँगवर मात करुन स्पर्धेची मोठ्या धडाक्यात सुरुवात केली आहे. मात्र १९ तारखेला पाकिस्तानची गाठ ही पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताशी पडणार आहे. भारताला हरवायचं असेल तर फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणं गरजेचं असल्याचं मत, पाकिस्तान कर्णधार सरफराज अहमदने व्यक्त केलं आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने हाँग काँगवर ८ गडी राखून मात केली.
कर्णधार या नात्याने हाँग काँग विरुद्धच्या सामन्यात काही गोष्टी अधिक चांगल्या करता आल्या असत्या. हा सामना आम्ही एकही विकेट न गमावता जिंकायला हवा होता. याचसोबत चेंडू असतानाही आम्ही अधिक चांगला खेळ करु शकलो असतो. सुरुवातीच्या षटकांमध्ये आमच्या गोलंदाजांचे चेंडू वळत नव्हते, ही गोष्ट मला चिंताजनक वाटते.” सामना संपल्यानंतर सरफराजने आपलं मत मांडलं.
भारताविरुद्ध सामन्याआधी या सर्व बाबींवर काम करणं गरजेचं असल्याचं सरफराजने स्पष्ट केलं. हाँग काँगविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या उस्मान खानला सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं. हाँग काँगने दिलेलं आव्हान पाकिस्तानने २३.४ षटकांमध्येच पूर्ण केलं. पहिल्या सामन्यात सरफराजच्या पायाला दुखापतही झाली होती, मात्र ही दुखापत फारशी गंभीर नसल्याचं सरफराजने स्पष्ट केलं.