Menu

देश
नक्षलवाद्यांचा सरकार उलथवण्याचा कट हे विधानच मूर्खपणाचे

nobanner

नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयातून पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईवरुन शिवसेनेने भाजपा सरकारला चिमटे काढले आहेत. नक्षलवाद्यांनी भाजपा सरकार उलथवण्याचा कट रचल्याचे विधान सरकारने करु नये. हे विधानच मूर्खपणाचे असून तुमचे सरकार कोण उलथवणार ?, मनमोहन सिंग यांचे सरकार नक्षलवाद्यांनी नव्हे तर जनतेने उलथवले होते. अजूनही सरकार लोकशाही मार्गानेच उलथवली जातात, अशा शब्दात शिवसेनेने भाजपाला फटकारले.

पुणे पोलिसांनी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणी देशाच्या विविध भागांमधून पाच जणांना अटक केली आहे. नक्षलवाद्यांनी भाजपा सरकार उलथवण्याचा कट रचल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून या घडामोडींवर भाष्य करण्यात आले आहे.

पोलिसांनी माओवाद्यांवर हल्ला केला असून देशभरात छापे घालून मोठ्या प्रमाणात धरपकड केली. अटक केलेल्या पाच जणांचा नक्षलींशी संबंध होता आणि त्यांचा भाजपा सरकार उलथवून लावण्याचा कट होता, अशी माहिती समोर आली आहे. या नक्षलींच्या हल्ल्यात काँग्रेस नेत्यांचाही मृत्यू झाला आहे. राज्याराज्यात अस्थिरता निर्माण करणे हाच त्यांचा उद्योग असून भीमा – कोरेगाव प्रकरणात दंगली घडवून राज्य पेटवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. चीनमध्येही माओवाद आहे. पण तिथे सरकार उलथवण्याचा प्रयत्न केला तर त्याला तुरुंगात डांबले जाते आणि ती व्यक्ती गायबही होते. मात्र, आपल्या देशात राजकारणी व विचारवंतांची एक फळी या उद्योग मंडळींच्या समर्थनार्थ उभी राहते. खरे – खोटे श्रीराम जाणे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजीव गांधी यांच्याप्रमाणे उडवायचा कट या मंडळींनी रचला होता, असा दावा पोलिसांनी न्यायालयात केला आहे. तरी देखील या मंडळींचे समर्थन कसे करता येऊ शकते?, असा सवाल शिवसेनेने विचारला आहे.

राज्यात हिंदुत्ववादी संघटनांमधील तरुणांना अटक करण्यात आली आहे. हिंदुत्ववादी तरुण दहशतवादी आणि माओवादी म्हणजे विचारवंत ही दुटप्पी भूमिका असून अशी दुटप्पी मांडणी करणे हा देशद्रोह असल्याची टीका शिवसेनेने केली आहे.

नक्षलवादी भाजपाप्रणीत सरकारे उलथवतील म्हणून त्यांना अटक केली असे सांगणे सरकारने थांबवावे. हे विधान मूर्खपणाचे असून तुमची सरकारे कोण उलथवणार? मनमोहन सिंग यांचेही सरकार नक्षलवाद्यांनी नाही, तर जनतेनेच उलथवले होते. सरकारे आज तरी लोकशाही मार्गानेच उलथवली जातात, असे शिवसेनेने म्हटले आहे. मोदी यांची सुरक्षा जगात ‘लय भारी’ असून त्यांच्या डोक्यावरून चिमणीही उडू शकत नाही. सरकारे उलथवून टाकण्याइतपत क्षमता या माओवाद्यांमध्ये असती तर पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मणिपूरमधील सरकारे त्यांनी गमावली नसती. त्यामुळे पोलिसांनी जिभेवर लगाम ठेवून कामे करावीत, नाहीतर मोदी व त्यांच्या भाजपचे नव्याने हसे होईल, असा सल्लाही शिवसेनेने दिला.