देश
पाच वेळा नाणेफेक हरल्यावर कोहली हताश, म्हणतो आता नाणंच बदला!
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ७ ते ११ सप्टेंबर दरम्यान लंडनमध्ये हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताने दोन बदल केले असून सामना जिंकण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करणार यात शंका नाही. पण या सामन्यातही विराटने नाणेफेक गमावली असल्याने विराट कोहली हताश झाल्याचे मैदानावर दिसून आले.
मैदानावर नाणेफेकीसाठी विराट कोहली आणि जो रूट आले. विराटने नाणेफेकीसाठी आपले मत दिले. पण अखेर पाचव्या सामन्यातही भारत नाणेफेक हरला. मालिकेतील या आधीच्या सर्व कसोटी सामन्यातही भारत नाणेफेक हारला होता. रुटने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर जेव्हा विराटला नाणेफेकीबाबत विचारले. तेव्हा तो काहीसा हताश होऊन म्हणाला कि आता दोनही बाजूला छापा असलेले नाणे मला वापरावे लागेल. तरच मी नाणेफेक जिंकू शकेन, असेही तो त्यावेळी म्हणाला.
दरम्यान, चौथा सामना जिंकून इंग्लंडने मालिका ३-१ने खिशात घातली आहे. पण आपली विजयी लय कायम राखण्यासाठी इंग्लंडचा संघ प्रयत्नशील आहे. तर दुसरीकडे दीर्घ अशा इंग्लंड दौऱ्यातील हा शेवटचा सामना असल्याने दौऱ्याचा शेवट गोड करण्याची भारताला संधी आहे. त्यामुळे पाचव्या कसोटीसाठी हनुमा विहारीचे संघात पदार्पण झाले आहे. तो भारताचा २९२वा खेळाडू कसोटीपटू ठरला आहे. याशिवाय, भारताने रवींद्र जडेजालाही संधी दिली आहे.