देश
भागवतांचे आभार मानणाऱ्या काँग्रेसच्या फलकाची चर्चा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दिल्लीतील कार्यक्रमात काँग्रेसच्या कार्याचे कौतुक केल्यानंतर चंद्रपूर जिल्हा-शहर काँग्रेस समितीने गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान शहरातील प्रमुख चौकात भागवतांचे आभार मानणारे फलक लावले आहेत. या फलकाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले असून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
भागवत मूळचे चंद्रपूरचे असून त्यांनी दिल्लीत विविध विषयांवर मार्गदर्शन करताना अनपेक्षितपणे काँग्रेसवर कौतुकाचा वर्षांव केला. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेस नेत्यांचे मोठे योगदान आहे. काँग्रेस नेत्यांनी देशासाठी बलिदान दिले असून अनेक थोर व महान नेते याच पक्षाने भारताला दिले आहेत. या शब्दात आपली मते मांडली. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा काँग्रेसमुक्त देशाची भाषा करत असताना भागवतांचे विधान लक्षवेधी ठरले.
‘..म्हणून आभार मानतो’
नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह बहुसंख्य भाजप नेते काँग्रेसला संपवण्याची भाषा करत असताना भागवतांनी काँग्रेसच्या कार्याची दखल घेतली. द्वेषाचे राजकारण सर्वत्र वेगाने पसरत असताना भागवतांनी घेतलेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो व त्यांचे आभार मानतो, अशा शब्दात शहर काँग्रेसचे अध्यक्ष नंदू नागरकर यांनी आपली भूमिका ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. दरम्यान, काँग्रेसने सरसंघचालकांचे छायाचित्र वापरून लावलेले हे फलक भाजपसाठी चांगलीच डोकेदुखी ठरले आहे. त्याचमुळे की काय गिरनार चौकात लावलेला एक फलक अज्ञात व्यक्तीने फाडून टाकला.