Menu

देश
मोदींची अवस्था ‘धोबी का कुत्ता’सारखी नको व्हायला: माजिद मेनन

nobanner

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेनन यांनी वादग्रस्त विधान केले आहे. नरेंद्र मोदी हे मुसलमानांना आकर्षित करण्यासाठी बोहरा समाजाकडे गेले. पण आगामी निवडणुकीत त्यांची अवस्था ‘धोबी का कुत्ता, ना घर का ना घाट का’ अशी होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी इंदूरमध्ये बोहरा मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यावर माजिद मेनन यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, नरेंद्र मोदींची अवस्था अशी आहे की कट्टर हिंदुत्ववादाच्या भूमिकेपासून लांब गेले की संघ व अन्य संघटनांकडून त्यांच्यावर दबाव येतो. आता ते बोहरा समाजाकडे गेले होते. मुसलमानांना पक्षाकडे आकर्षित करण्याचा हा प्रयत्न होता. पण शेवटी ते ना इकडचे राहतील ना तिकडचे. ‘धोबी का कुत्ता, ना घर का ना घाट का’ सारखी त्यांची अवस्था असेल, असेही ते म्हणाले. आता हे पंतप्रधानांवरच अवलंबून असेल की कोणत्या बाजूला झुकतील. असे नको व्हायला की ते इकडचेही नसतील आणि तिकडचेही नसतील. दुर्दैवाने त्यांची अवस्था तशीच होण्याची चिन्हे आहेत, असे त्यांनी सांगितले.

मेनन यांच्या विधानामुळे वाद निर्माण झाला असून आता भाजपाकडून यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शुक्रवारी मोदी इंदूरमध्ये प्रेषित महम्मद यांचे नातू इमाम हुसेन यांच्या हौतात्म्याचे स्मरण जपण्यासाठी आयोजित बोहरा मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. बोहरा समाजाने कष्टाळूपणाच्या जोरावर सरकारच्या उद्योग अनुकूल धोरणांचा लाभ घेतला. शांततामय सहजीवनाचा संदेश याच समाजाने जगभर नेल्याचेही मोदींनी म्हटले होते.



Translate »