देश
शतकाकडे जोरदार वाटचाल, पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरूच
दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये होत असलेली वाढ काही थांबण्याची चिन्हं नाहीयेत. आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरांमध्ये 28 पैशांची तर डिझेलच्या दरांमध्ये 19 पैशांची वाढ झाली आहे. परिणामी मुंबईत प्रतिलिटर पेट्रोलचा दर 89.29 रुपयांवर आणि डिझेलचा दर 78.26 रुपयांवर पोहोचला आहे.
राजधानी दिल्लीतही पेट्रोलच्या दरामध्ये वाढ झाल्याने एक लिटर पेट्रोलसाठी 81.91 पैसे आणि डिझेलसाठी 73.72 रुपये मोजावे लागणार आहे. दररोज वाढत चाललेल्या डिझेल व पेट्रोलच्या किमतींमुळे सर्वसामान्य जनता अक्षरशः मेटाकुटीला आली आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे दैनंदिन जीवनात लागणाऱ्या इतर वस्तूंचेही भाव वाढत आहेत. गेल्या आठवड्यामध्ये केवळ बुधवारी इंधन दरवाढीला ब्रेक लागला होता. या दिवशीही इंधनाचे दर कमी झाले नव्हते पण स्थिर होते.