देश
१४ जणांचे बळी घेणाऱ्या वाघिणीला ठार करण्याचे आदेश
यवतमाळ जिल्ह्यतील राळेगाव वनपरिक्षेत्रात दोन वर्षांत चौदा जणांचे बळी घेणाऱ्या वाघिणीला ठार मारण्याच्या निर्णयावर मंगळवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. वाघिणीला आधी बेशुद्ध करून जेरबंद करण्याचा प्रयत्न करा. वाघीण बेशुद्ध करण्यात अडथळे आल्यास तिला गोळी झाडा, असे आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए.के. मिश्रा यांनी दिले.
राळेगाव वनपरिक्षेत्रातील अनेक गावांमध्ये या वाघिणीची गेल्या दोन वर्षांपासून प्रचंड दहशत होती. या वाघिणीला यापूर्वीही जेरबंद करण्याचे प्रयत्न झाले. मात्र, त्यात यश आले नाही. गावकऱ्यांच्या बळींची संख्या वाढतच गेल्याने वनखात्यावरील त्यांचा रोषही वाढत होता. ताडोबाच्या धर्तीवर राळेगाव वनपरिक्षेत्रात तारेचे कुंपण लावण्याचा प्रस्ताव देखील वनखात्याने तयार केला होता. मात्र, गावकऱ्यांनी वाघिणीला मारण्याची मागणी लावून धरली होती. काही दिवसांपूर्वीच ही वाघीण वनखात्याच्या ट्रॅप कॅमेऱ्यात आली होती.
राळेगाव, कळंब, पांढरकवडा तालुक्यात या वाघिणीची प्रचंड दहशत आहे. गावकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असल्याने वाघांचा बंदोबस्त करावा म्हणून ग्रामस्थांनी आक्रमक होऊन हिंसक आंदोलने केली. या वाघिणीला आठ महिन्यांचे दोन बछडे आहेत. गावकऱ्यांनी हे बछडे देखील हिंसक असल्याची तक्रार केली होती.