देश
आधी ब्रिटिशांनी आपले विभाजन केले आता आपणही तेच करतोय, आनंद महिंद्रा उद्विग्न
गुजरातमध्ये बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या लोकांवर करण्यात आलेले हल्ल्यानंतर निर्माण जालेला असंतोष अद्यापही कायम आहे. या हल्ल्यांनंतर वाराणसीहीमध्ये यानंतर मोदींविरोधात पोस्टबाजी करण्यात आली. या पोस्टर्समध्येही वाराणसीमध्ये राहत असलेल्या सर्व गुजराती आणि महाराष्ट्रातील लोकांनी एका आठवड्याच्या आत वाराणसी सोडून जावे असा इशारा देण्यात आला आहे. या राज्याराज्यांमधील तापलेल्या वादामुळे एकंदरीतच देशात परराज्यातील लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून संपूर्ण प्रकाराबद्दल आपले मत व्यक्त करताना देशांतर्गत विभाजन हा सर्वात मोठा धोका असल्याची भिती व्यक्त केली आहे.
दोन दिवसांपूर्वी आनंद महिंद्रांनी केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘सध्या आपल्या देशाला सर्वात मोठा धोका आहे तो (वैचारिक) विभाजनाचा. आपले विभाजन केल्याचा आरोप आपण ब्रिटिशांवर करतो. मात्र आज आपण त्यासाठी स्वत:लाच दोष द्यायला हवा. आपण यासाठी राजकारण्यांना दोष देऊ शकत नाही. आपल्या सर्वांनाच आपल्या राज्याच्या पलिकडे जाऊन पाहण्याची गरज आहे. तसे न केल्यास आपला देश राहणार नाही तो केवळ वेगवेगळ्या तुकड्यांचा संच असेल.’
या ट्विटवर अनेकांनी महिंद्रांना समर्थन व्यक्त केले आहे. तर अनेकांनी परराज्यात येणारे बेरोजगारांचे लोंढे थांबवून त्यांच्या राज्यातच रोजगार निर्माण केल्यास प्ररप्रांतियांचा हा प्रश्नच निर्माण होणार नाही असे मत व्यक्त केले आहे. परप्रांतियांना त्यांच्या राज्यात नोकरी द्यावी. दुसऱ्या राज्यांतून आलेल्यांसाठी स्थानिकांनी नोकऱ्या का गमवाव्यात केवळ दुसऱ्या राज्यातील लोक कमी पैश्यात काम करतात म्हणून? असा प्रश्न उपस्थित केला. त्याला महिंद्रा यांनी उत्तर दिले आहे. हेच प्रश्नार्थक ट्विट कोट करुन महेंद्र म्हणतात, ‘याच विचारसरणीशी आपल्याला लढायचे आहे. जेव्हा आपण आपल्याच देशातील इतर भागातील लोकांना विस्थापित म्हणतो तेव्हाच खऱ्या अर्थाने अचडणींना सुरुवात होते’
महिंद्रांच्या दोन्ही ट्विटवर नेटकऱ्यांनी मते व्यक्त केली असून यापैकी पहिल्या ट्विटला हजारो रिट्विट आणि लाइक्स मिळाले आहेत. तर दुसऱ्या ट्विटवर काही शे जणांनी रिप्लाय करुन आपले मत मांडले आहे.