देश
उत्तर प्रदेशमच्या दंगलग्रस्त गावात मुस्लिमांसाठी हिंदू तरुणाची आदर्शवत मोहीम
उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर येथील दंगलग्रस्त दुल्हेडा गाव…. २०१३ मधील दंगलीनंतर अनेक मुस्लीम कुटुंबांनी हे गाव सोडले… पण आता याच मुस्लीम कुटुंबांना गावात परत आणण्यासाठी एका हिंदूने मोहीम सुरु केली असून सध्याच्या वातावरणात संजीव प्रधान यांनी राबवलेली ही मोहीम आदर्शवत ठरते.
२०१३ मधील दंगलीनंतर दुल्हेडा गावात राहणाऱ्या ६५ मुस्लीम कुटुंबांनी गाव सोडले होते. भीतीपोटी गाव सोडून गेलेल्या या मुस्लीम कुटुंबांनी पुन्हा गावात परतावे यासाठी गावात राहणारे ४२ वर्षीय संजीव प्रधान मोहीम राबवत आहे. गाव सोडून गेलेल्या कुटुंबांशी संजीव संपर्क साधत असून यातील ३० कुटुंबाची त्यांनी यशस्वी मनधरणी केली आणि हे ३० कुटुंब गावी परतले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
दंगलीच्या वेळीही प्रधान यांनी गावातील काही मुस्लिमांना स्वत:च्या घरी राहायला जागा दिली होती. इतकेच नव्हे त्यांचे रक्षणही केले होते. प्रधान यांच्याबाबत गावातील अफसाना बेगम सांगते, चार वर्षांपूर्वीचे ते दिवस मला अजूनही आठवतात. संजीव आणि त्यांचे काही सहकारी आमच्या मशिदीचे रक्षण करत होते. त्यांनी कोणालाही मशिदीला हात लावू दिला नाही. स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांनी आमचे रक्षण केले. जर त्यांनी आम्हाला परतण्यास सांगितले तर मी त्यांच्यावर विश्वास ठेवू शकते.
मुस्लीम समाजातील लोकांसाठी प्रधान हे देवासारखे मदतीला धावून आले असले तरी हिंदू समाजातील काही लोकांनी प्रधान यांचा कडाडून विरोध केला होता. यावर प्रधान म्हणतात, मुसलमान वाईट की हिंदू वाईट?. माझ्या मते माणूस वाईट असतो. आपण बदल घडवलाच पाहिजे. या विचारधारेवर ठाम राहणे सोपे नव्हते. जाट समाजातील लोकांनी माझा विरोध केला, असे त्यांनी नमूद केले.
संजीव यांच्याविषयी अनेक मुस्लीम कुटुंब भरभरुन बोलतात. ‘दंगलीमुळे आम्ही खूप घाबरलो होतो. संजीव तिथे नसते तर आमचा मृत्यू अटळ होता’, असे बाला बानो यांनी सांगितले. ‘सप्टेंबर २०१३ साली परिस्थिती बिघडत होती. संजीव यांनी आमच्या घरातील पुरुषांना गावी परतायला सांगितले. सुरक्षेच्या दृष्टीने संजीव यांनी आम्हाला स्वत:च्या घरी नेले होते. ते रोज रात्री घराबाहेर बसून आमचं रक्षण करायचे, असे बानो यांनी आवर्जून सांगितले. संजीव यांनी ३०० हून अधिक मुस्लिमांची पलहेर आणि शाहपूर येथील मदत केंद्रात राहायची सोय केली होती. ते आमच्या सोबत मदत केंद्रात यायला तयार होते. पण आम्हीच त्यांना येण्यापासून रोखले. त्यांच्या जिवालाही धोका निर्माण झाला असता, असे गावातील मुस्लीम सांगतात. हिंदू आणि मुस्लीम एकमेकांवर अवलंबून आहे. दोघांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे आणि मी त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न करत राहीन, असे त्यांनी सांगितले.