Menu

खेल
पृथ्वी शॉच्या कामगिरीवर कर्णधार विराट कोहली समाधानी

nobanner

मुंबईचा उदयोनमुख खेळाडू पृथ्वी शॉने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करुन सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पृथ्वीने १३९ धावांची खेळी केली. त्याच्या या कामगिरीवर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली चांगलाच खूश आहे. सामना संपल्यानंतर विराटने पृथ्वीच्या खेळीचं कौतुक केलं.

“पृथ्वीने ज्या पद्धतीने खेळ केला आहे तो पाहून मी खूप आनंदी आहे. पहिलाच सामना खेळत असताना त्याने विंडिजच्या गोलंदाजांवर पूर्णपणे वर्चस्व गाजवलं. त्याच्या या खेळीमुळे मी प्रभावीत झालोय, आपल्यात एक वेगळं कौशल्य असल्याचं त्याने दाखवून दिलं आहे.” विराट पृथ्वीच्या खेळाची स्तुती करत होता. पृथ्वी शॉ, विराट कोहली आणि रविंद्र जाडेजा यांनी झळकावलेल्या शतकांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ९ गड्यांच्या मोबदल्यात ६४९ धावांपर्यंत मजल मारली होती.

वेस्ट इंडिजवर १ डाव २७२ धावांनी मात करत भारताने कसोटी क्रिकेटमधल्या आपल्या सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली आहे. फलंदाजांप्रमाणे गोलंदाजांनीही या सामन्यात वाखणण्याजोगी कामगिरी केली. इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत पत्कराव्या लागलेल्या पराभवानंतर भारताने मायदेशात पहिला कसोटी सामना खेळताना दमदार पुनरागमन केलं आहे. इंग्लंडमधून परतल्यानंतर परिस्थितीशी जुळवून खेळ करणं हे संघासमोरचं मोठं आव्हान होतं हे देखील विराटने मान्य केलं आहे.