देश
फटाक्यांचे दोन तास ठरवण्याची राज्यांना मुभा, ग्रीन क्रॅकर्सची सक्ती दिल्लीपुरतीच
सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीत फटाके फोडण्यासाठी रात्री ८ ते १० ही वेळ निश्चित केली होती. परंतु, न्यायालयाने आता आपल्या आदेशात बदल केला आहे. राज्यांना फटाके फोडण्यासाठी वेळेत बदल करता येईल. पण कालावधी दिवसातून दोन तासांहून अधिक नसेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरीसारख्या ठिकाणी सकाळी दिवाळी साजरी केली जाते. त्यामुळे तामिळनाडूने याबाबत न्यायालयात धाव घेतली होती. तसेच हरित फटाक्यांचा वापर करण्याचा आदेश हा फक्त दिल्ली-एनसीआरसाठीच होता. उर्वरित भारतासाठी नव्हता हेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
तामिळनाडू सरकारने रात्री ८ ते १० या वेळेतील परवानगीशिवाय राज्यातील जनतेसाठी पहाटे ४.३० ते ६.३० दरम्यानही फटाके फोडण्याची परवानगी द्यावी, अशी सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली होती. यावर निर्णय देताना खंडपीठाने म्हटले की, जर राज्यांना हवे असेल तर ते दोन तासांचा अवधी सकाळी एक तास आणि सायंकाळी एक तास असा विभागू शकतील. तामिळनाडूत पारंपारिक पद्धतीने सकाळी दिवाळी साजरी केली जाते. तर उत्तर भारतात दिवाळी रात्री साजरी केली जाते.
यापूर्वी २३ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना, केवळ परवानाधारक व्यक्तिलाच फटाके विकता येतील असे म्हटले होते. फटाक्यांमध्ये हानीकारक रसायनांचा वापर केला जाऊ नये. कमी प्रदूषण असणारे फटाके फोडले जावेत. दिवाळीत रात्री ८ ते १० वाजेपर्यंतच फटाके फोडता येतील. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतावेळी फक्त २० मिनिटेच फटाके फोडता येतील, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले होते.