देश
भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनची ‘रौप्य’कमाई
अर्जेंटिना येथे सुरु असलेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत आज भारताच्या लक्ष्य सेन याने बॅडमिंटनमध्ये रौप्यपदकाची कमाई केली. पुरुष एकरी गटात त्याला अंतिम फेरीत त्याला पराभवाचा सामना करावा लागला. चीनच्या शिफाइंग ली याने त्याला २१-१५, २१-१९ अशा सरळ गेममध्ये पराभूत केले. त्यामुळे काही काळापूर्वी क्रमवारीत अव्वल असलेल्या लक्ष्य सेनला पुन्हा अव्वलस्थान मिळवणे अवघड झाले आहे.
एकूण ४२ मिनिटे चाललेल्या या सामन्यात लक्ष्यने पहिल्यापासूनच निराशाजनक खेळ केला. त्यामुळे चीनच्या खेळाडूला सामन्यावर वर्चस्व मिळवणे सहज शक्य झाले. ली याने पहिला गेम २१-१५ असा सहज जिंकला. दुसऱ्या गेममध्ये मात्र लक्ष्यने चांगली झुंज दिली. दोघांमध्येही दुसरा गेम अटीतटीचा झाला. अखेर चीनच्या ली ने २१-१९ असा गेम जिंकला आणि सामनाही जिंकला.
या विजयाबरोबर भारताची पदकसंख्या ६ झाली आहे. यात ३ सुवर्ण आणि ३ रौप्यपदकाची कमाई केली.