देश
भुसावळमध्ये चंद्रकांत पाटील यांना दाखवले काळे झेंडे
राज्याचे महसूलमंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सोमवारी भुसावळमध्ये भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. पालकमंत्री मुर्दाबादच्या घोषणा देत त्यांच्या राजीमान्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली.
चंद्रकांत पाटील यांच्या गाड्यांचा ताफा सोमवारी सकाळी भुसावळ शासकीय विश्रामगृहातून फैजपूरकडे जाण्यासाठी निघाला. अटल महाकृषी शिबिरासाठी ते जात होते. मात्र, काही अंतरावरच भारिपच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून ताफा अडवला. जिल्ह्यातील विविध कामे होत नसल्याच्या निषेधार्थ भारिपतर्फे हे आंदोलन करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री पदाला पाटील न्याय देत नसल्याने त्यांनी तातडीने पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही कार्यकर्त्यांनी केली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे सुरक्षा रक्षकांची तारांबळ उडाली. त्यांनी कार्यकर्त्यांना बाजूला केल्यानंतर पाटील यांचे ताफा पुढे निघाले. यावेळी राज्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.