Menu

देश
‘या’ कारणासाठी दीडशतक झळकावल्यानंतर गंभीरने सोडली फलंदाजी

nobanner

भारताचा सलामीवीर गौतम गंभीर हा काही काळापासून टीम इंडियातील स्थानासाठी झगडताना दिसतो आहे. पण वयाच्या ३६व्या वर्षीदेखील त्याने आशा सोडलेली नाही. सध्या सुरु असलेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेत तो आपल्या फलंदाजीची चमक दाखवत आहे. दिल्लीच्या संघाचे सक्षमपणे नेतृत्व करतानाच तो आपली फलंदाजीची तितकीच बहरेल याची पुरेपूर काळजी घेत आहे. शुक्रवारी केरळविरुद्ध झालेल्या सामन्यात गंभीरने १५१ धावा ठोकल्या. त्याने १०४ चेंडूत १८ चौकार आणि ४ षटकारांची आतषबाजी करत हा पराक्रम केला.

गंभीरच्या या खेळीने चाहते तर सुखावलेच, पण त्याच्या या दीडशतकी खेळीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्याच्या या खेळीची चर्चा झाली. पण त्यापेक्षा अधिक चर्चा झाली ती त्याने दीडशतक झळकावल्यानंतर फलंदाजी सोडण्याचा निर्णय घेतला त्याची. गंभीर लयीत फलंदाजी करत होता. १० षटकांचा खेळ शिल्लक असताना गंभीरने १५० धावांचा टप्पा ओलांडला होता. त्याच्याकडे ‘लिस्ट अ’ प्रकारात द्विशतक झळकावण्याची सुवर्णसंधी होती. पण तरीदेखील गंभीर फलंदाजी सोडण्याच्या निर्णय घेतला. या निर्णयामागचे कारण होते ते म्हणजे इतर युवा फलंदाजांना फलंदाजीची संधी मिळावी.

गंभीर फलंदाजी सोडून मैदानाबाहेर गेल्यामुळे युवा फलंदाज नितीश राणा आणि प्रांशू विजयरन या दोघांना संधी मिळाली. नितीशला त्या संधीचे सोने करता आले नाही. पण ध्रुव शोरी याने मात्र विजयरनच्या साथीने शेवटच्या १० षटकात ९७ धावा फाटकावल्या. ध्रुवने नाबाद ९९ धावा केल्या.

या सामन्यात स्वतःचा विक्रम करण्यापेक्षाही युवांना संधी देण्याच्या गंभीरच्या ‘त्या’ निर्णयाचे सर्वत्र कौतुक झाले आणि त्याच्या मनाचा मोठेपणा हा चर्चेचा विषय ठरला.