देश
#MeToo विषयी राधिका आपटे म्हणाली…
गेल्या काही दिवसांपासून हिंदी कलाविश्वात आणि इतरही विविध क्षेत्रांमध्ये सुरु असणाऱ्या #MeToo या चळवळीमुळे बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत. मुख्य म्हणजे इतकी वर्षे लैंगिक शोषणाच्या झळा सोसणाऱ्या अनेकजणींनी त्यांना सामोरं जावं लागणाऱ्या वाईट प्रसंगांविषयी खुलेपणाने भाष्य केलं आहे.
फक्त लैंगिक शोषण झालं आहे त्याच अभिनेत्री याविषयी खुलेपणाने भाष्य करत आहेत असं नाही. तर, इतरही बऱ्याच सेलिब्रिटींनी याविषयी आपल्या प्रतिक्रिया देत या चळवळीला पाठिंबा दिला आहे.
कलाविश्वात लिंगभेद सपून समानता असलीच पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा अभिनेत्री राधिका आपटे हिने मांडला आहे.
एका कार्यक्रमात माध्यमांशी संवाद साधताना तिने हे वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं.
राधिका संपर्कात असणाऱ्या ‘क्वान एंटरटेन्मेंट’ kwan entertainment या सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनीच्या संस्थापकावरही चार महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.
राधिकाला याविषयीच प्रश्न विचारत तू या कंपनीशी असणारं नातं पुढे सुरु ठेवणार की त्याविषयी महत्त्वाचा निर्णय घेणार, असं विचारलं असता आपण त्या कंपनीच्या संपर्कात असून या मुद्द्यावर आपलं बोलणं सुरु असल्याचं ती म्हणाली. शिवाय, क्वानकडून सदर प्रकरणी कठोर निर्णय घेण्यात येणार असून तेसुद्धा #MeTooला पाठिंबा देत आहेत, असं तिने स्पष्ट केलं.
एम.जे. अकबर यांच्या राजीनाम्याविषयीसुद्धा यावेळी तिला प्रश्न विचारण्यात आले. यावर येत्या काळात सदर प्रकरणात अनेक नावं समोर येतील, कारण यात अनेकांचच नाव गोवलं गेलं आहे, असं ती म्हणाली.
एक कलाकार म्हणून सध्याच्या घडीला सर्वांनीच या कलाविश्वात एकत्र येत परिस्थिती कशी सुधारता येईल, याचेच प्रयत्न करावेत असं मत तिने मांडलं.
विविध विषयांवर आपल्या ठाम भूमिका मांडणाऱ्या राधिकाची ही प्रतिक्रिया पाहता आता कलाविश्वात नेमकी कोणती पावलं उचलली जाणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.