देश
उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय आजारी
तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिकांचा अभाव; खाटांची संख्या अपुरी, रुग्ण, नातेवाईकांचे हाल
शहापूर तालुक्यातील कसारा, डोळखांब, माऊली किल्ला परिसर या दुर्गम भागातील रुग्णांच्या उपचारासाठी मुख्य आधारस्थान असलेले शहापूर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिकांचा अभाव, अपुऱ्या रूग्ण खोल्या, उपलब्ध कर्मचारी, डॉक्टरांवरील वाढता कामाचा भार, डॉक्टरांचे राजीनामे यामुळे ‘आजारी’ पडले आहे. ‘रूग्णसेवा हेच ब्रीद’ घेऊन काम करणाऱ्या येथील सेवेकरी डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांची अशा परिस्थितीत घुसमट होत आहे.
या अवघडलेल्या परिस्थितीत रुग्ण सेवा देताना रुग्ण, नातेवाईकांच्या रोषाला डॉक्टर, कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागते. हवामाातील बदलांमुळे सध्या ताप, सर्दी, मलेरिया, विषमज्वर, खोकला आणि इतर साथीच्या आजाराचे सुमारे ८०० ते ९०० रुग्ण रोज रुग्णालयात बा रुग्ण विभागात उपचार, तपासण्यांसाठी येत आहेत. शहापूर तालुक्यातील बहुतेक वस्ती डोंगर दऱ्या, दुर्गम भागात आहे. खासगी रुग्णालयातील उपचार परवडत नसल्याने या भागातील बहुतांश रुग्ण उपचार मिळतील या अपेक्षेने शहापूर उपजिल्हा सरकारी रुग्णालयात येतात. उपचारासाठी दाखल झाल्यानंतर उपचारापेक्षा रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांना रूग्णालयातील घुसमटीला मोठय़ा प्रमाणात सामोरे जावे लागते, असे काही रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले.
एक खोलीत २० रुग्ण खाटा आणि तेवढेच रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे एकेका खोलीत ३० ते ४० रुग्णांची सोय करून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करावे लागतात. खाटांची संख्या अपुरी पडत असल्याने अनेकदा रुग्णांना जमिनीवर बिछाना टाकून उपचार करावे लागतात. डॉक्टर, परिचारिकांना अशा रुग्णांवर उपचार करताना अडचणींना सामोरे जावे लागते. अशा रूग्णांना सलाइन लावताना नवीन सुविधा करावी लागते. असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
रक्त, लघवी, थुंकी तपासणीसाठी वाढीव तंत्रज्ञांची आवश्यकता आहे. तपासणीसाठी एकावेळी ३०० ते ४०० रुग्ण उभे राहतात. हा सगळा भार सत्र पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर येतो. दुसऱ्या सत्रातील कर्मचारी आला नाही तर २४ तास एखाद्या कर्मचाऱ्याला कार्यरत राहावे लागते. अनेक वेळा रुग्ण, नातेवाईक रांगेत तासन्तास उभे राहुनही वेळेत उपचार होत नाहीत म्हणून डॉक्टर, परिचारिका, तपासणी तंत्रज्ञावर भडकतात. या अवघड परिस्थितीशी तोंड देत शहापूर सराकारी रूग्णालयातील डॉक्टर वैद्यकीय सेवा देत आहेत, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. अनेक कर्मचारी हक्काच्या बदलीसाठी प्रयत्नशील आहेत. या बदल्या शासन स्तरावरून वेळेत करण्यात येत नसल्याने काही कर्मचारी अनियमित आहेत. या गैरहजर कर्मचाऱ्यांचा भार अन्य कर्मचाऱ्यांवर पडत आहे. या बदली कर्मचाऱ्यांचा प्रश्न आरोग्य विभागाकडून सोडविण्यात येत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
ऑक्टोबरमधील उष्ण तपमान वाढल्याने ताप, खोकल्याचे रुग्ण उपचारासाठी येत आहेत. रुग्ण संख्या, खाटांच्या प्रमाणात सेवा देणाऱ्या डॉक्टरांची संख्या कमी आहे. आताच चार डॉक्टरांनी राजीनामे दिलेत. तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव आहे. अशा परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत चांगली रुग्ण सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.