Menu

देश
कार्बाइन विकणारी टोळी जेरबंद

nobanner

अत्याधुनिक शस्त्र पाहून पोलीसही हैराण

कार्बाइनसारखे घातक स्वयंचलित अग्निशस्त्र विकण्यास आलेल्या टोळीला रबाळे पोलिसांनी जेरबंद केले असून तिघांचा शोध सुरू आहे. आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून ही शस्त्रे कुणासाठी आणण्यात आली, याबाबत तपास सुरू आहे.

केवळ पोलिसांना वापरण्याची परवानगी असलेले कार्बाइन शस्त्र पहिल्यांदाच मिळून आल्याने पोलीसही चक्रावले आहेत.

वासिउल्लाह किताब उल्लाह चौधरी, मतीउल हक वहाब, मानिकाप्रसाद पटेल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. नवी मुंबईत धातक शस्त्रविक्री करण्यास काही जण आल्याची खबर सहआयुक्त सुरेशकुमार मेखला यांना मिळाली होती. त्या अनुशंगाने पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

हे आदेश प्राप्त झाल्यानंतर काही दिवसांतच रबाळे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजय कुंभार यांना घणसोली, ऐरोली भागात शस्त्रव्यवहार होणार आहे, अशी माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर दोन महिने तपास केल्यावर कुंभार यांना खबऱ्याने माहिती दिली. त्यानुसार बुधवारी रात्री घणसोलीत एक शस्त्रव्यवहार होणार होता. या आधारावर घणसोली सेक्टर ११ अटलांटा सोसायटीसमोर सापळा रचण्यात आला.

रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे आणि पोलीस उपनिरीक्षक अजय कुंभार यांच्यासह अन्य नऊ जण या सापळ्यात सामील होते. दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर संशयित इनोव्हा गाडी या ठिकाणी आली. काही वेळाने रिक्षातून एक जण उतरला. त्यांच्या सर्व हालचाली संशयास्पद असल्याने हेच आपले सावज असल्याचे कळताच पोलिसांनी त्यांना घेरून पकडले. गाडीची झडती घेतली असता

त्यांना १ कार्बाइन, दोन पिस्तुले, १० जिवंत काडतुसे, दोन मॅगझीन सापडले. शस्त्रांसह इनोव्हा गाडी आणि रिक्षा जप्त केली असून गाडी चौधरी याची असल्याची माहिती समोर आली.

आरोपी उत्तर प्रदेशमधील

हे तिघेही मूळ राहणारे उत्तर प्रदेशमधील कबीरनगर येथील असून यातील चौधरी हा डोंबिवलीतील लोढामध्ये सुताराचे काम करतो. वासिम याच्याकडे पत्रकार असल्याचे ओळखपत्र सापडले असून त्याची मुदत संपलेली आहे. ही शस्त्रे कुठून आणली, कुणासाठी आणली? आरोपींची पाश्र्वभूमी काय आहे? या बाबत तपास सुरू आहे अशी माहिती परिमंडळ एकचे उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी दिली.