Menu

देश
चीन सीमेवर तैनात असलेल्या ITBP च्या जवानांसोबत पंतप्रधान मोदींनी साजरी केली दिवाळी

nobanner

पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी जवानांसोबत दिवाळी साजरी करतात. यावर्षी पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडमधील हर्षिल गावात आयटीबीपीच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. उंच बर्फाळ पर्वतरांगांमध्ये तुम्ही ज्या निष्ठेने कर्तव्य बजावताय त्यामुळे देशाला बळ मिळते. तुमच्यामुळे देशातील १२५ कोटी जनतेची स्वप्ने आणि भविष्य सुरक्षित आहे असे पंतप्रधान कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे. दिवाळी अंधकार, निराशा दूर करते असे मोदी म्हणाले. जवान आपल्या कटिबद्धता आणि शिस्तीद्वारे सर्वसामान्यांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करतात असे मोदी म्हणाले. गुजरातचा मुख्यमंत्री होतो तेव्हापासून प्रत्येक दिवाळी जवानांसोबत साजरी करत असल्याची आठवण मोदींनी सांगितले.

माजी सैनिकांच्या कल्याणासाठी वन रँक, वन पेन्शनसह सरकारने सैनिकांसाठी घेतलेल्या वेगवेगळया निर्णयांचा त्यांनी उल्लेख केला. मागच्यावर्षी पंतप्रधानांनी काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये बीएसएफच्या जवांनासोबत दिवाळी साजरी केली होती. मोदी पंतप्रधान झाल्यापासून प्रत्येक दिवाळी जवानांसोबत साजरी करत आहे. यंदाचे पाचवे वर्ष आहे.

जवानांसोबत दिवाळी साजरी केल्यानंतर पंतप्रधानांनी उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले व तिथे सुरु असलेल्या निर्माण कार्याचा आढावा घेतला. पंतप्रधान झाल्यापासून ते तिसऱ्यांदा केदारनाथ मंदिरात आले आहेत. केदारनाथावर जलाभिषेक केल्यानंतर त्यांनी पूजा-अर्चाही केली तसेच मंदिराला प्रदक्षिणाही मारली.

केदारनाथमध्ये पुनर्निमाणाचे काम कसे सुरु आहे याचा ते स्वतः आढावा घेत आहेत. काही अधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. केदारनाथ मंदिराचे दृश्य सध्या अत्यंत विहंगम असे दिसून येते आहे. मंदिरामागे असलेल्या डोंगरांवर बर्फाची दुलईच पसरली आहे. केदारनाथ मंदिर फुलांनी सजवण्यात आले असून ही सजावट अत्यंत उठून दिसते आहे. केदारनाथाच्या चरणी नतमस्तक झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंड प्रलयावर काढण्यात आलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शनही पाहिले.