Menu

देश
निविदेविनाच भंगारविक्रीचा घाट

nobanner

कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमातील भंगार निविदा न मागविताच विकण्याचा घाट परिवहनच्या भंगार विक्री समितीने घातल्याने खळबळ उडाली आहे. निविदा पद्धतीने भंगार विकले तर ठेकेदारांमध्ये स्पर्धा होऊन वाढीव पैसे उपक्रमाला मिळू शकतात. समितीने निविदा प्रक्रियेला फाटा देऊन उपक्रमातील गेल्या अनेक वर्षांचे भंगार ठेकेदारी पद्धतीने विकण्याचा घाट घातल्यामुळे उपक्रमाचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

भंगार विक्री समितीमधील एक सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांनी समितीच्या या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे. समितीचा निर्णय चुकीचा असून हा उपक्रमाचे आर्थिक नुकसान करण्याचा हा प्रयत्न आहे. परिवहन उपक्रमातील बसचे निकामी, सुटे भाग, टायर्स, टय़ूब, वंगण, पिंप, फ्लॅब, वायर हे भंगार निविदा प्रक्रिया पूर्ण करून, मगच विकावे, अशी मागणी म्हात्रे यांनी आयुक्त गोविंद बोडके व परिवहन व्यवस्थापक मारुती खोडके यांच्याकडे केली आहे. इतर सदस्यांच्या मताला आपले अनुमोदन नाही. निर्णय एकमुखी नाही, असे म्हात्रे यांनी सांगितले.

२०१४ ते २०१७ मधील परिवहन आगारातील भंगार साहित्याची विक्री करण्यापूर्वी शासनमान्य मूल्यांकन समितीकडून या भंगाराचे मूल्यांकन काढण्यात आले. मूल्यांकन अहवालानुसार भंगाराचे वर्गीकरण करण्याचे सूचित करण्यात आले आहे. मात्र विविध सबबी देऊन वर्गीकरण टाळले जात आहे.

परिवहन उपक्रम तोटय़ात आहे. कर्मचाऱ्यांना वेतनासाठी पैसे नाहीत. अशा परिस्थितीत भंगार विक्रीतून उपक्रमाला चांगले पैसे मिळू शकतात, असे प्रल्हाद म्हात्रे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. एका ठेकेदाराला बोलावून त्याला भंगार विकणे म्हणजे उपक्रमाचे आर्थिक नुकसान करण्यासारखे आहे. ठेकेदारी पद्धतीने भंगार विक्री न करता निविदा प्रक्रिया राबवून उपक्रमातील भंगार विक्री करण्याची मागणी म्हात्रे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

वर्गीकरणात अडथळे

मूल्यांकन अहवालानुसार भंगाराचे वर्गीकरण करण्याचे सूचित करण्यात आले आहे. मात्र आगारात बसची वर्दळ असते. भंगार साहित्याचे वर्गीकरण कसे करायचे, असे प्रश्न करून काही सदस्यांनी वर्गीकरणात अडथळा आणल्याचे कळते. या भंगार साहित्यामुळे डासांचा उपद्रव वाढल्याचा शोध काही सदस्यांनी लावला आहे. आगाराच्या बाजूला वालधुनी नदी आहे. बाराही महिने या भागात डासांचा उपद्रव असतो. शिवाय भंगार विक्रीचा निर्णय होऊन ११ महिने उलटल्यानंतर हे आक्षेप घेतले जात आहेत.