देश
पाकिस्तानला इशारा! आमच्याकडे मोठे लष्कर आहे, आम्ही सज्ज आहोत
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोमवारी दहशतवादाच्या मुद्यावरुन पाकिस्तानी लष्कराला खडेबोल सुनावले. भारत आणि पाकिस्तानमध्ये कर्तारपूर साहब कॉरिडॉर बांधण्यात येणार आहे. याच कार्यक्रमाच्या पाकिस्तानात होणाऱ्या भूमीपूजनाचे निमंत्रण त्यांनी नाकारले.
मागच्या आठवडयात अमृतसरमधील प्रार्थना स्थळावर झालेल्या हल्ल्यावरुन त्यांनी पाकिस्तानला लक्ष्य केले. गावामध्ये लोक प्रार्थना करत असताना त्यांच्यावर ग्रेनेड फेकण्यात आले. हे लष्करामध्ये शिकवले जाते का ? हा भेदरटपणा आहे असे अमरिंदर म्हणाले. मला एक सैनिक म्हणून पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांना प्रश्न विचारायचा आहे.
कुठले लष्कर शस्त्रसंधीचे उल्लंघन करायला शिकवते ? पठाणकोट आणि अमृतसर येथे हल्ला करण्यासाठी माणसे पाठवायला कुठले लष्कर शिकवते हा सर्व डरपोकपणा आहे असे कॅप्टन अमरिंदर म्हणाले. आमचा शांततेवर विश्वास आहे आणि आम्ही इथून शांततेचा संदेश देत आहोत. पण जनरलनी एक गोष्टी लक्षात घ्यावी की, आमच्याकडे मोठे लष्कर आहे आणि आम्ही सज्ज आहोत असा इशारा त्यांनी पाकिस्तानला दिला.
कोणालाही युद्ध नकोय. आम्हाला शांततेमध्ये विकास हवा आहे असे अमरिंदर म्हणाले. १८ नोव्हेंबरला अमृतसरमधल्या निरंकारी हॉलवर हल्ला झाला. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने हा हल्ला घडवून आणला असा आरोप त्यांनी केला.