देश
पेट्रोलच्या दरात १७ पैशांची कपात, डिझेलचे दरही घटले
गेल्या काही दिवसांपासून देशात इंधन दरात कपात होताना दिसत आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरात घट होण्याची मालिका आजही सुरुच राहिली आहे. यामुळे ग्राहकांना अल्पसा दिलासा मिळाला आहे. मुंबईत आज पेट्रोलच्या दरात १७ पैशांनी तर डिझेलच्या दरात १६ पैशांची कपात करण्यात आली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर ८३.०७ तर डिझेल ७५.७६ रुपये इतके आहे.
दिल्लीमध्येही पेट्रोलच्या दरात १७ पैशांची तर डिझेलच्या दरात १५ पैशांची कपात करण्यात आली आहे. तिथे पेट्रोल ७७.५६ रुपये प्रति लिटर तर डिझेल ७२.३१ रुपये दराने मिळेल.
गेल्या महिन्यात इंधनाचे दर शंभरीच्या घरात पोहोचले होते. त्यावेळी देशभरातून सरकारवर मोठ्याप्रमाणात टीका होत होती. जनतेचा रोष लक्षात घेता केंद्र सरकारने राज्य सरकारांना कर कमी करण्याची विनंती केली होती. त्याला विविध राज्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत इंधनावरील कर कमी केले होते. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थितीनुसार देशातील इंधन दरात सातत्याने अल्प घट होताना दिसत आहे.