देश
सज्जनगडावर मुलाला दगडाजवळ सोडले, दरीत उडी मारून युगुलाची आत्महत्या
सातारा येथील सज्जनगड येथे फिरायला आलेल्या प्रेमी युगुलाने गडावरुन उडी मारुन आत्महत्या केली. पूनम मोरे आणि नीलेश मोरे असे या युगुलाचे नाव आहे. यातील पूनम मोरे या महिलेला ४ वर्षांचा मुलगा असल्याचे समजते. मुलाला गडावर एका दगडाजवळ सोडून त्यांनी आत्महत्या केली.
पूनम अभय मोरे (वय २४) या मूळच्या पाटण तालुक्यातील बोडकेवाडीच्या रहिवासी आहेत. सध्या त्या पतीसोबत मुंबईत राहत होत्या. तर नीलेश मोरे हा त्यांचा नातेवाईक आहेत. तो देखील मुंबईत राहतो. पूनम आणि नीलेश यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, नातेवाईक असल्याने त्यांना लग्न करणे शक्य नव्हते. दोघेही बुधवारी सज्जनगडावर फिरायला आले होते. दुपारी या दोघांनी गडावरुन उडी मारुन आत्महत्या केली. महाबळेश्वर येथील सह्याद्री ट्रेकर्सच्या मदतीने त्यांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.
सज्जनगडावर घटनास्थळापासून काही अंतरावर चार वर्षांचा मुलगा देखील सापडला आहे. तो पूनमचा मुलगा आहे. मुलाला एका दगडाजवळ सोडून त्यांनी उडी मारली. ‘लग्नाला विरोध असल्याने त्यांनी हे पाऊल उचलले असावे’, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला.